होमपेज › Pune › बोगस निविदांद्वारे तिप्पट दराने ‘मेडिक्लोअर’ची विक्री

बोगस निविदांद्वारे तिप्पट दराने ‘मेडिक्लोअर’ची विक्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वडगाव मावळ : वार्ताहर 

मावळ तालुक्यातील 104 ग्रामपंचायतींमध्ये बोगस निविदांद्वारे बाजारभावापेक्षा तिप्पट दराने ‘मेडिक्लोअर’ (पाणी शुद्ध करण्याचे द्रव) विक्री करण्याचा गोरखधंदा ग्रामसेवकांच्या संगनमताने एका निलंबीत ग्रामसेवकाकडून सुरु असल्याची तक्रार दत्तात्रय काजळे यांनी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत चिखलसे येथील दत्तात्रय काजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना लेखी तक्रार केली असून यामध्ये प्रामुख्याने खडकाळा ग्रामपंचायतमध्ये झालेला प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.

तालुक्यात एकूण 104 ग्रामपंचायती असून पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना ‘मेडिक्लोअर’चे वाटप केले जाते. मेडिक्लोअरची 100 मि.ली.ची बाजारात 15 ते 17 रुपयांना मिळणारी बाटली ग्रामपंचायतीला मात्र 40 ते 45 रुपये दराने विकली जात आहे.

हा प्रकार सन 2010 पासून तालुक्यात सुरु असून हा गोरखधंदा खोट्या जातीच्या दाखल्यामुळे सेवेतून निलंबीत झालेला ग्रामसेवक करत असल्याचे काजळे यांनी म्हटले आहे. याशिवाय, मासिक सभेचा ठराव न घेता, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची मान्यता न घेता ग्रामसेवक बोगस निविदांच्या आधारे संबंधित पुरवठादाराकडून हे मेडिक्लोअर तिप्पट भावाने खरेदी करत आहेत.

त्यामुळे गेल्या 7 वर्षे सुरु असलेल्या या गैरप्रकाराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी काजळे यांनी केली आहे.

विभागीय आयुक्तांनी दिला चौकशीचा आदेश

दरम्यान, काजळे यांच्या तक्रारीनुसार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सबंधीत प्रकाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांना दिला आहे.