Fri, Sep 18, 2020 13:42होमपेज › Pune › पुण्यात दुसरा सिरो सर्व्हे लवकरच

पुण्यात दुसरा सिरो सर्व्हे लवकरच

Last Updated: Aug 06 2020 1:31AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

एखाद्या समूहामध्ये कोरोनाशी लढा देणारी प्रतिकारशक्ती किती प्रमाणात तयार झाली आहे, याची चाचणी करण्यासाठी पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाकडून दुसरा ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयातील 500 आरोग्य कर्मचार्‍यांचे नमुने त्यासाठी घेतले जाणार आहेत. पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने महापालिकेकडून पहिला ‘सिरो सर्व्हे’ करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याचे निष्कर्ष दहा ऑगस्टपर्यंत येणार आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

सिरो म्हणजे रक्त आणि रक्ताच्या चाचणीद्वारे अँटीबॉडीचा घेतला जाणारा शोध म्हणजे ‘सिरोलॉजिकल सर्वेक्षण’ किंवा ‘सिरो सर्व्हे’ होय. या सर्वेक्षणात वय आणि प्रांतानुसार ठराविक गट, समूहाची निवड केली जाते. कोरोनाबाधित व बाधित न झालेल्या, मात्र लक्षणविरहित नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यामध्ये कोरोनाशी लढा देणार्‍या अँटीबॉडी (प्रतिपिंडे) रक्तात आहेत का, हे पाहिले जाते. जर त्या असतील, तर त्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे असे स्पष्ट होते. तसेच ठराविक समूहात किती प्रमाणात अँटीबॉडी विकसित झाल्या, याची माहिती याद्वारे मिळते. अशा प्रकारचा सर्व्हे मुंबई, बीड, अहमदनगर या जिल्हयांत यापूर्वीच झाला आहे.

पुण्यातील पहिल्या ‘सिरो सर्व्हे’ची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे देण्यात आलेली आहे. शहरातील हॉटस्पॉटमधील ज्यांना कोरोना झालेला नाही, अशा नागरिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. शहरातील पाच हॉटस्पॉटमध्ये वय वर्षे 18 च्या पुढील नागरिकांचा करण्यात येणारा हा सर्व्हे अंतिम टप्प्यात असून, येत्या 10 ऑगस्टपर्यंत त्याची माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

दुसरा ‘सिरो सर्व्हे’ करण्याची जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासनाने बीजे वैद्यकिय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाकडे दिली आहे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विभागाकडून हा सर्व्हे करण्यात येत असून, ते रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ असे 500 जणांचे रक्ताचे नमुने त्यासाठी एकत्रित घेतले जाणार आहेत. गजर पडल्यास त्यामध्ये आणखी वाढ केली जाणार आहे. त्यापूर्वी रुग्णालयातील निती समितीची (इथिक्स कमीटी) त्यासाठी मान्यता घेतली जाणार आहे.

दुसरा ‘सिरो सर्व्हे’ हा केवळ ससून रुग्णालयापुरताच मर्यादित राहणार आहे; कारण बाहेर जाउन रक्ताचे नमुने घेण्यासाठी रुग्णालयाकडे पुरेसा स्टाफ उपलब्ध नाही. बाहेर जाउन सर्व्हे करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे. 

 "