Wed, Aug 12, 2020 12:52होमपेज › Pune › निकाल अवघ्या 15 मिनिटांत होणार जाहीर

निकाल अवघ्या 15 मिनिटांत होणार जाहीर

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 10:40PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

वडगाव नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार (दि.20) रोजी होणार असून, एकाच फेरीमध्ये ही प्रक्रिया पार पडणार असल्याने अवघ्या 15 मिनिटांत संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, सहाय्यक रणजीत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महसूल भवनमध्ये शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरु होणार असून 17 प्रभागांसाठी 17 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरु होणार असल्याने 15 मिनिटांत ही प्रक्रिया संपणार आहे.ही निवडणूक भाजप, श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी व वडगाव-कातवी नगरविकास आघाडी अशी तिरंगी झाली असून, एकाही पॅनेलला सर्व 17 जागांवर निवडणूक लढवता आली नाही; तसेच नगराध्यक्षपदासाठीही तीनही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली आहे.याशिवाय, भर पावसात एकूण 14 हजार 736 मतदारांपैकी तब्बल 11 हजार 520 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने व मतदानानंतर निकाल चार दिवसांनी लागत असल्याने निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

दरम्यान, चुरशीने झालेल्या या निवडणुकीमुळे आमदार संजय भेगडे यांच्यासह लोकप्रतिनिधी असलेले स्थानिक नेते सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रथम नगराध्यक्ष कोण आणि बहुमत कोणाला? 

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी भास्करराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, मयूर ढोरे हे तीन मातब्बर उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रथम नगराध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता असून एकाही पॅनेलने संपूर्ण 17 जागा लढविल्या नसल्याने बहुमत नेमके कोणाला मिळणार याची उत्सुकता वडगावकरांसह संपूर्ण मावळवासीयांना आहे.