Tue, Jul 07, 2020 20:11होमपेज › Pune › स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी हवेत ४ हजार २०० कोटी

स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी हवेत ४ हजार २०० कोटी

Last Updated: Dec 04 2019 1:08AM
पुणे : पांडुरंग सांडभोर
स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोचा प्रस्तावित मार्ग भुयारीच होणार असून, त्यासाठी तब्बल 4 हजार 200 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. साडेपाच किमीच्या या मार्गावर पुष्पमंगल चौक, शंकर महाराज मठ आणि राजीव गांधी उद्यान अशी केवळ तीनच मेट्रो स्टेशन असणार आहेत. महामेट्रोकडून या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे.

शहरात पहिल्या टप्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यात स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यास मुख्यसभेबरोबरच राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी यापूर्वीच दिली आहे.  त्यानुसार गतवर्षी या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम महापालिकेने महामेट्रोला दिले होते. महामेट्रोने या मार्गाचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबधीचा डीपीआर तयार केला आहे. हा डीपीआर नुकताच महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

त्यानुसार स्वारगेट ते कात्रज हा 5. 4 किमीचा मार्गावर भुयारी मेट्रो प्रस्तावित करण्यात आली. त्यासाठी या प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंतचा खर्च हा 4 हजार 203 कोटी इतका होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने या प्रकल्पाचा खर्च 3 हजार 246 कोटी इतका आहे. तर त्यामध्ये इतर सर्व प्रकराचा खर्च अपेक्षित धरून तो जवळपास 4 हजार 200 कोटींवर जाणार आहे. हा मार्ग स्वारगेटवरून मार्केट यार्ड, बिबवेवाडी अशा मार्गे वळविण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, महामेट्रोने केलेल्या डीपीआरनुसार हा मार्ग सरळ सातारा रस्त्यांवरील मार्गाप्रमाणेच आखण्यात आला आहे. या मार्गावरील भुयारी स्टेशनसाठी 9 हजार 350 चौरस मीटर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.  

दरम्यान, महामेट्रोकडून हा डीपीआर आता महापालिका आयुक्‍तांकडे सादर करण्यात आला आहे. त्याचे प्रशासनापुढे, तसेच पक्षनेत्यांपुढे सादरीकरण करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

धनकवडीकरांसाठी स्टेशन नाही
या मार्गावर तीन भुयारी स्टेशन प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यात पहिले स्टेशन पुप्ष मंगल चौक, त्यानंतर पद्मावती येथील शंकर महाराज मठाजवळ आणि तिसरे स्टेशन हे कात्रज येथील राजीव गांधी उद्यान येथे असणार आहे. मात्र, धनकवडी आणि बालाजीनगर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या परिसरात एकही स्टेशन प्रस्तावित करण्यात आलेले नाही.

२०२७ पर्यंत ९५ हजार प्रवासी
महामेट्रोकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार स्वारगेट ते कात्रज या मार्गावर 2027 ला 95 हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर 2057 ही संख्या जवळपास दुप्पट म्हणजेच 1 लाख 97 हजार इतकी दर्शविण्यात आली आहे.

स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या डीपीआर तयार करण्याचे काम आम्ही महामेट्रोला दिले होते. या डीपीआरनुसार जो निधी उभारावा लागणार आहे. तो राज्य आणि केंद्राकडून उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर.