Sat, Nov 28, 2020 19:07होमपेज › Pune › काश्मीरमध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती

काश्मीरमध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती

Last Updated: Jul 09 2020 1:19AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

लष्करातील 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना केली आहे. गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे. तेथे या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्याकरिता कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंतीचे पत्र पाठविले. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान्यता देऊन गणपतीची मूर्ती रेल्वेने जम्मू-काश्मीरला पाठवली.

कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टला पाठविलेल्या पत्रात म्हटले की, मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व सैनिकांनी योगदान दिले. मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळजवळ 4 ते 5 फूट इतका बर्फ होता. परंतु, तरीही सैनिकांनी कामाला सुरुवात केली. 

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, सैनिकांच्या इच्छेनुसार अडीच फुटांची गणेशमूर्ती या मंदिरासाठी ट्रस्टने भेट दिली आहे. ही फायबर ग्लासमधील 36 इंचांची मूर्ती जून महिन्यामध्ये सैनिकांकडे सोपविण्यात आली. आता ती प्रत्यक्ष मंदिरात विराजमान झाली आहे.

काश्मिरात घुमला ‘मोरया’चा जयघोष!

काश्मीरमध्ये तैनात 6 मराठा बटालियनकडून पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जवानांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा केलेला जयघोष खोर्‍यातील आसमंतात निनादला.