पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, तसेच यंदा उसाची जास्त लागवड असल्यामुळे, ऊस तोडणी कामगारांसोबत या कामासाठी स्थानिक मजुरांचे गट, तसेच ऊस तोडणी यंत्राचा वापर करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे. त्यासंदर्भात विविध कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक सहकार मंत्र्यांनी घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. तीन महिन्यानंतर गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यावेळची त्या - त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. कामगारांची काळजी घेतली जाईल. यंदा सुमारे आठशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्घ असून, सुमारे 190 कारखाने सुरू होतील असा अंदाज आहे.