Tue, Jan 19, 2021 23:29होमपेज › Pune › बारामती : फायनान्स कंपन्यांना कडक इशारा!

बारामती : फायनान्स कंपन्यांना कडक इशारा!

Last Updated: Jul 03 2020 4:40PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

फायनान्स कंपन्यांनी ऑगस्ट 2020 अखेर आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे कर्जवसूली करू नये. तरीही कंपन्यांनी दादागिरी केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिला.

गुरुवारी (दि. 2) शहर पोलिस ठाण्यात शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील विविध फायनान्स कंपन्यांचे व्यवस्थापक, वसूली अधिकारी यांची हप्ते वसूलीच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीत हा इशारा देण्यात आला. दरम्यान कर्जदाराकडे हप्त्याचा तगादा लावल्याच्या कारणावरून बजाज फायनान्स कंपनीच्या वसूली अधिकाऱ्यासह अन्य लोकांवर गत आठवड्यात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतरही हप्ते वसूलीसाठी तगादा सुरु असल्याने अखेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी यासंबंधी बैठक घेतली.

कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन यामुळे अनेकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीत मार्च ते ऑगस्टपर्यंत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने हप्ते वसूलीला स्थगिती दिली आहे. तरीही स्थानिक पातळीवर अनेकांना वसूली अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जबरदस्तीने कर्ज वसूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा शिरगावकर यांनी या बैठकीत दिला.  

फेब्रुवारी 2020 पर्यंतचे कर्जदारांचे प्रलंबित हप्ते वसूल करताना कंपन्यांनी वसूली विभागाला योग्य ती समज द्यावी. महिलांशी त्यांनी सौजन्याने वागावे. कर्ज वसूलीला जातेवेळी ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फायनान्स कंपन्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली असावी. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले तर थेट गुन्हे दाखल करू असा इशारा यावेळी देण्यात आला. 

कर्जदारांनी कंपन्यांकडे अर्ज करत मुदत वाढवून घ्यावी. परंतु वसूली अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कर्जदाराला त्रास देवू नये, हप्त्याबाबत तगादा लावू नये. ग्राहकांनी हप्त्यावर खरेदी केलेल्या वस्तू वसूली अधिकाऱ्यांमार्फत जबरदस्तीने हिसकावून घेण्यात येवू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. 

या बैठकीला बजाज, एयू बँक, एचडीबी, टाटा, महिंद्रा , कोला मंडल, सुंदरम, श्रीराम आदी फायनान्स कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.