Sat, Oct 31, 2020 12:02होमपेज › Pune › पुणे : वाहून गेलेल्‍या मित्रांचे मृतदेह सापडले

पुणे : वाहून गेलेल्‍या मित्रांचे मृतदेह सापडले

Last Updated: Oct 18 2020 8:05PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

नदीची वाढलेली पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेलेले दोन तरुण सेल्फी काढताना बुडल्याची घटना शुक्रवारी बाबा भिडे पुलानजीकच्या घाटावर घडली होती. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला होता. दरम्‍यान आज (रविवार) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे एनडीआरएफच्या जवानांना सापडले. एक मृतदेह महापालिके जवळील ब्रिज जवळ तर दुसरा मृतदेह संगमब्रिज जवळ सापडला.  

ओकार तुपधर (वय. 18) आणि सौरभ कांबळे( वय. 20, दोघे रा. ताडीवाला रोड ) हे दोघेही सेल्फी काढताना शुक्रवारी नदीत बुडाले होते. 

बुधवारपासून धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सौरभ व ओकार आणि दोन मित्र बाबा भिडे पुलानजीक फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. 

यावेळी तिसरा मित्र चेतन याने आणि नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला, कुटुंबियांना तसेच पोलिसांना  दिली. यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.  अग्निशमन दलाचे जवान मुलांचा शोध घेन्यासाठी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शोधकार्य सुरू केले. शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत तसेच शनिवारी दिवसभर एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. तरीही दोघे सापडले नाही. रविवारी नदीपात्रातील पाणी कमी झाले. पहाटे पावणे सहा वाजल्यापासून एनडीआरएफचे जवान बोटी घेऊन दोघांचा शोध घेत असताना एकाचा मृतदेह महापालिका ब्रिजजवळ तर दुसऱ्याचा मृतदेह संगमब्रिज जवळ पाण्यात तरंगत असल्याचा आढळुन आला. एनडीआरएफ जवानांची एक टीम, कसबा अग्निशमन केंद्र आणि कसबा अग्निशमन केंद्राचे 21 जवान दोन दिवस दोघांचाही शोध घेत होते. अशी माहिती अग्निशमन अधिकारी सुनील नाईकनवरे यांनी दिली. दरम्यान दिघांचेही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 "