Mon, Jun 01, 2020 04:03होमपेज › Pune › पुणे : 'तबलिगी'मध्ये सहभागी झालेल्‍या ७० जणांचा घेतला शोध

पुणे : 'तबलिगी'मध्ये सहभागी झालेल्‍या ७० जणांचा घेतला शोध

Last Updated: Apr 01 2020 7:05PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील तब्बल 130 नागरिक सहभागी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी त्यातील 70 जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला आहे. यामध्ये शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील लोकांचा सहभाग आहे. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, पोलिस व आरोग्य विभागाच्या वतीने इतरांचा देखील शोध सुरू आहे. यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत यातील 40 जणांचा शोध पोलिसांनी घेतला होता. त्यानंतर आता हा आकडा सत्तरच्या घरात गेला आहे. 

या जमातीच्या दिल्ली येथील कार्यक्रमात देश विदेशासह हजारो लोक सहभागी झाले होते. यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील काहीजणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यात परत कमी की काय म्हणून, जमातीच्या  कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक लोकं महाराष्ट्राच्या विविध भागात परतली आहेत. 

त्यामुळे यातील काही लोकांना कोरोनाची लागण झालेली असेल, तर नक्कीच ही बाब चिंता निर्माण करणारी असून, पुढील कालावधीसाठी धोक्याची घंटा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोधून काढलेल्या नागरिकांचे क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या घशातील स्‍वॅबचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.