Mon, Sep 28, 2020 14:50होमपेज › Pune › बुलेट ट्रेनचा मार्ग; पुणे-मुंबई-अहमदाबाद-साबरमती

बुलेट ट्रेनचा मार्ग; पुणे-मुंबई-अहमदाबाद-साबरमती

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 10:30AMनिमिष गोखले

पुणे : पुणे-मुंबई ‘बुलेट ट्रेन’ दृष्टिपथात आल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे. मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ पुण्यापर्यंत धावणार का, याबाबत मध्यंतरी साशंकता निर्माण झाली होती. पुण्याला वगळून बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अशी सुसाट सुटणार, अशा चर्चांनाही ऊत आला होता. लोणावळा-खंडाळ्याच्या अवघड घाट टप्प्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान ‘बुलेट ट्रेन’ धावणार नाही, असे रेल्वेचे अधिकारी खासगीत सांगत होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांनी पुणे-मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेळोवेळी त्यावर चर्चा झाली; मात्र पुण्याला वगळले जाणार, असे चित्र निर्माण झाल्याने दरवेळीप्रमाणे पुण्याला वाटाण्याच्या अक्षताच दाखविण्यात येणार असल्याचे दिसले. परंतु एखादी घोषणा रेल्वे बजेटमध्ये केल्यास तो निर्णय बदलला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे मंजूर झालेला प्रस्ताव बदलला जाऊ शकत नाही, या नियमावर बोट ठेवत काहींनी थेट केंद्र सरकारचे दरवाजे ठोठावले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, केंद्र सरकारने पुण्यापर्यंत ‘बुलेट ट्रेन’ नेण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे, असे या सूत्रांनी सांगितले. 

फेब्रुवारी 2016 मध्ये ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन’ची स्थापना करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2022 मध्ये पूर्णत्वास येणार आहे. पुणे-मुंबई-अहमदाबाद अंतर 650 किलोमीटर असून, ही ‘बुलेट ट्रेन’ ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, लोणावळ्याच्या घाट टप्प्यात, बोगदा मोठा करून घाट बायपास करत ही ‘बुलेट ट्रेन’ मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती अभियांत्रिकी विभागाने दिली आहे. यामुळे घाटाचा मुद्दा उरणार नसून, ‘बुलेट ट्रेन’ न होण्यामागील कारणच संपुष्टात आले आहे. 

जमिनीपासून सुमारे चार फूट उंचीवर (एलिव्हेटेड) ही ‘बुलेट ट्रेन’ धावणार असून, काही ठिकाणी ती ‘अंडरग्राउंड’ (जमिनीखालून) देखील करण्यात येणार आहे.  यापूर्वी केवळ मुंबई-अहमदाबाद अशी असणारी ‘बुलेट ट्रेन’ भविष्यात पुणे-मुंबई-अहमदाबाद-साबरमती अशी धावणार असून, साबरमती हे तिचे शेवटचे स्थानक असणार आहे. 

ही बुलेट ट्रेन वडाळामार्गे धावणार असून, पुण्याहून मुंबईला केवळ अर्धा तासात पोहोचता येणे सहज शक्य होणार आहे. ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत, वडोदरा येथे या गाडीला थांबा देण्यात येणार आहे. ‘पुणेकरांनी दिलेल्या सततच्या लढ्याला यश आले असून, ‘बुलेट ट्रेन’ पुण्यापर्यंत येणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने केला असून, त्याचे सर्वेक्षण येत्या 2-3 महिन्यांत सुरू होणार आहे, ही पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. पुणे-मुंबई ‘हायपरलूप’ (कॅप्सुल ट्रेन) व ‘बुलेट ट्रेन’ समांतर नेण्यात यावी’, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे. 

कमी अंतरासाठी ‘बुलेट ट्रेन’च योग्य

भारतात प्रवास करताना कमी अंतरासाठी विमानापेक्षा रेल्वेलाच प्रवाशांकडून पसंती देण्यात येते असे दिसून आले आहे. पुणे-दिल्ली, पुणे-चेन्नई, पुणे-कोलकाता, पुणे-कोची या लांब पल्ल्याच्या अंतरासाठी मात्र विमानाच्याच पर्यायाचा वापर केला जातो. मात्र पुणे-मुंबई, पुणे-हैदराबाद, पुणे-अहमदाबाद या कमी अंतराच्या टापूसाठी रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीचाच वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे केंद्र सरकारने दोन मोठ्या शहरांमध्ये, परंतु ज्यांच्यामधील अंतर कमी आहे, अशांमध्ये ‘बुलेट ट्रेन’चाच पर्याय योग्य आहे, असा निर्वाळा दिला. त्यामुळे भविष्यात दिल्ली-अमृतसर, बंगळुरू-हैदराबाद, जयपूर-दिल्ली, बनारस-अलाहबाद, बनारस-लखनौ अशा मार्गांवरही ‘बुलेट ट्रेन’ सुरू होण्याची शक्यता आहे.