Fri, Sep 18, 2020 19:43होमपेज › Pune › पुणे-मिरज दुहेरीकरण येत्या अडीच वर्षांत

पुणे-मिरज दुहेरीकरण येत्या अडीच वर्षांत

Published On: Jun 13 2019 1:50AM | Last Updated: Jun 13 2019 1:50AM
पुणे : प्रतिनिधी 
पुणे-मिरजदरम्यान बहुप्रतिक्षित दुहेरीकरणाचे (डब्लिंग) काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. डिसेंबर 2021 पर्यंत दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर या मार्गावरून जलदरीत्या प्रवास करणे शक्य होणार आहे. सद्यःस्थितीत पुणे-मिरज या 280 किलोमीटर अंतराच्या रेल्वे प्रवासाकरिता तब्बल सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. हा मार्ग एकेरी असल्याने गाड्यांचा वेग कमी असतो. त्यातच स्थानकावर क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबवली जात असून, प्रवाशांचा वेळ नाहक वाया जातो. दुहेरीकरणानंतर मात्र पुणे-मिरज प्रवास केवळ पाच तासांमध्ये पूर्ण करता येऊ शकणार आहे.

डिसेंबर 2022 ही दुहेरीकरणाची डेडलाइन आहे, परंतु कामाचा वेग पाहता 2021 अखेरपर्यंतच हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दरवर्षी सुमारे 50 किलोमीटर दुहेरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. घोरपडी-सासवड, सासवड-फुरसुंगी, फुरसुंगी-आळंदी, आंबळे-राजेवाडी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून, हे काम लवकरच पूर्ण होईल. 2019-2020 मध्ये शंभर किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते वेळेआधीच कसे पूर्ण होईल, याकडे लक्ष दिले जाईल, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दिली. 

पुणे-कोल्हापूर विद्युतीकरणाचे कामही प्रगतिपथावर

पुणे-कोल्हापूर विद्युतीकरणाचे कामही प्रगतिपथावर असून, येत्या तीन वर्षांत ते पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी 513 कोटींची तरतूद करण्यात आली असून, हा संपूर्ण मार्ग 326 किलोमीटर लांबीचा आहे. मिरज ते कोल्हापूरदरम्यानचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. सद्यःस्थितीत पुणे-सातारादरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पीजीसीआयएल कंपनीच्या वतीने हे काम करण्यात येत असून, 2021 अखेरपर्यंत या मार्गावर विजेवर चालणारी रेल्वे धावू लागेल.

पुणे-मिरजदरम्यानची प्रमुख स्थानके

घोरपडी, सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, राजेवाडी, जेजुरी, निरा, लोणंद जंक्शन, वाठार, जरंडेश्‍वर, सातारा, कोरेगाव, कराड, शेणोली, किर्लोस्करवाडी, सांगली, विश्रामबाग.