Thu, Sep 24, 2020 17:30होमपेज › Pune › वेगाने होणार्‍या कामांसह अनेक वैशिष्ट्यांची असणार पुणे मेट्रो

वेगाने होणार्‍या कामांसह अनेक वैशिष्ट्यांची असणार पुणे मेट्रो

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 1:18AM

बुकमार्क करा

पुणे : ज्योती भालेराव-बनकर

भारतात कलकत्ता, हैद्राबाद, दिल्ली, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो सुरू करण्यात आल्या आहेत अथवा येथे काम चालू आहे. याठिकाणी नसणार्‍या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सोयी- सुविधा पुणे मेट्रोसाठी करण्यात येणार आहेत. याशिवाय वेगाने काम हेही एक वैशिष्ट्य आहेच. अनेक वेगळ्या संकल्पना घेऊन महामेट्रो पुणेकरांसाठी 2021 पर्यंत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी मार्ग खुला करणार आहे.

दिल्ली येथील मेट्रोमध्ये अथवा इतर ठिकाणी ज्या अनेक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत, त्या पुणे शहरातील मेट्रोला देण्यात येणार असल्याचे महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले आहे. यात स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, विजेसाठी  वापरण्यात  येणारे सोलर सिस्टिम, स्वारगेट येथे करण्यात येणारे मल्टिमॅाडेल हब अशा अनेक वैशिष्ट्यांना घेऊन येथील मेट्रो तयार होणार आहे. 

पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. त्या पुण्याच्या अनेक महत्त्वपूर्ण पारंपरिक गोष्टींचे प्रतिबिंब, जसे की पुणेरी पगडी मेट्रो स्थानकांच्या रचनेत दिसावी आणि गर्दीचेही योग्य प्रमाणात नियंत्रण व्हावे अशीच रचना असणार आहे. या रचना करण्याचे काम प्रसिद्ध वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि स्पेन येथील आयेशा या संस्थेकडे  देण्यात आले आहे. मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गीकेवरील काम मोठ्या प्रमाणात सुरू  असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास अथवा या मार्गिकेदरम्यान बांधकामाच्या जागी काही अपघात झाल्यास महामेट्रोकडून जलद कृती दल तैनात करण्यात आले आहे. या जलद कृती दलामार्फत अनेक सुविधा पुरवण्यात येत आहेत. आठवड्यातील सातही दिवस व चोवीस तास कार्यरत असणार आहे. 

मेट्रो मार्गांच्या बांधकामामध्ये ज्या वृक्षांचा अडथळा होत आहे, त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार आहे. अशा मोठ्या 137 व लहान 200 वृक्षांचे पुनर्रोपण होणार असल्याचे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

दोनशे लहान झाडांपैकी 60 लहान झाडांचे  पुनर्रोपण झाले असून, मोठ्या झाडांच्या पुनर्रोपणाच्या प्रात्यक्षिकांचे काम सुरू करण्यात आले आहे. महामेट्रोकडून राबवण्यात येणार्‍या पर्यावरणविषयक धोरणामुळे पुणेकरांना निश्‍चितच दिलासा मिळत आहे.

पुणे मेट्रोचे काम सहज, सुरळीत होण्यासाठी महामेट्रोकडून नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सहयोग केंद्राला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोसंदर्भातील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी त्याचा निश्‍चित फायदा होत आहे. 
    
प्रवाशांना भुयारी मार्गाचा वापर करणे सोपे जावे यासाठी त्या मार्गावरील इतर वाहतूक सुविधांना (बस, रेल्वे) एकमेकांशी जोडले जाणार आहे.
पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक दिसून येईल अशा पद्धतीने मेट्रो स्थानकांची रचना. 
मेट्रो मार्गांवर नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘सहयोग केंद्र’ 
पहिल्या मेट्रो स्टेशनला सोलार सिस्टीम.
अपघात व वाहतूक नियंत्रणसाठी जलद कृती दल.
अडथळा ठरणार्‍या वृक्षांचे पुनर्रोपण होणार.