पुणे : पुढारी वृत्तसेवा
‘सिरम’मध्ये ‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून, जानेवारी 2021 च्या दुसर्या आठवड्यात ती भारतात वितरणासाठी तयार असेल. ती सर्वप्रथम भारतातील लोकांनाच आणि परवडेल अशा दरात देण्यात येईल. त्यानंतर जगातील इतर देशांत पाठवण्यात येईल. युरोपिय व अमेरिकन देशांतून अॅस्ट्राझेनेका ही कंपनी वितरण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लसीची सुरक्षितता, उपलब्धता, साठवण व किंमत याबाबत सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगितले.
मोदी यांच्या दौर्यानंतर शनिवारी सायंकाळी 7 वाजता पूनावाला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी यांचे जगभरातील लसींबाबतचे ज्ञान ऐकून आम्ही अवाक् झालो. त्यांना सर्वच माहिती असल्याचे दिसले. त्यांनी लसीच्या किमती, साठवणीची क्षमता, उपलब्धता याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कोल्ड चेनच्या साठवणुकीबाबतची माहितीही त्यांनी जाणून घेतली. सुमारे दीड तास त्यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी कोणताही लेखी करार झाला नाही. या लसीची अंतिम चाचणी पूर्णत्वाकडे असून, ती जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात उपलब्ध होईल. तत्पूर्वी, ती आरोग्य विभागाच्या मान्यतेसाठी पाठविली जाईल. 2021 मध्ये 30 ते 40 कोटी डोस तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. मोदी यांच्या भेटीने आम्ही भारावून गेलो आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
आमची लस सुरक्षितच; 60 टक्के सुरक्षिततेची हमी‘कोव्हिशिल्ड’ लसीचे तापमान 2 ते 8 अंश सेल्सिअसवर नियंत्रित करावे लागणार आहे. यासाठी शीतगृह यंत्रणा सज्ज आहे, असे सांगून पूनावाला म्हणाले की, ‘कोव्हिशिल्ड’बाबत उलटसुलट चर्चा थांबविली पाहिजे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, 60 टक्के संरक्षण देणारी आहे. कोणालाही लस दिल्यानंतर संसर्ग झाला, तरी त्याच्यावर दवाखान्यात भरती होण्याची वेळ येणार नाही, हे मी खात्रीने सांगतो.
4.30 वा. हेलिकॉप्टरने आगमन;5.53 वा. प्रयाण
शनिवारी दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान मोदी यांचे हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात थेट हेलिकॉप्टरने आगमन झाले. पांढराशुभ— कुर्ता व चेक्सचे मफलर अशा साध्या वेशात मोदी आले होते. सुमारे 93 मिनिटे मोदी ‘सिरम’मध्ये होते.
तीन किलोमीटरचा परिसर सील; दोघांना अटक
पंतप्रधानांच्या दौर्यामुळे हडपसर ते मांजरी या रस्त्यावर प्रचंड पोलिस बंदोबस्त दिवसभर होता. दुपारी 2 नंतर या भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, छोट्या चहाच्या टपर्या बंद करण्यात आल्या होत्या. ‘सिरम’लगतच्या सर्व इमारतींवर पोलिसांचा पहारा होता. नागरिकांना खिडक्या, गॅलरी व गच्चीवरून डोकावण्यास मनाई करण्यात आली होती. सुमारे दीड तासानंतर मोदी यांचे हेलिकॉप्टर आकाशात झेपावले आणि मगच या परिसरातील दुकाने पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मोदी यांच्या आगमनानंतर आसारामबापूंच्या दोन अनुयायांनी त्या ठिकाणी येऊन निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांना पोलिसांनी अटक केली.
सिरमच्या चमूशी अत्यंत उत्तम व फलदायी संवाद झाला. सिरमने कोव्हिशिल्ड लसीबद्दलची इत्थंभूत माहिती दिली. सिरमची उत्पादन यंत्रणाही मला प्रत्यक्ष बघता आली. उत्पादनाचा वेग व प्रमाण शक्य तितका वाढविणार असल्याचा आश्वस्त करणारा शब्दही सिरमने दिला आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
लसीच्या आपत्कालीन वापरसाठी परवानगी घेणार
कोव्हिशिल्ड लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापर करण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी घेण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन आठवड्यांत यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे ‘सिरम’चे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले. लस तयार झाल्यानंतर त्याची घोषणा आरोग्य मंत्रालायकडून केली जाईल, असेही ते म्हणाले.