Tue, Mar 09, 2021 15:40




पुणे : चोरट्यांनी भोसकल्‍यानंतर त्‍यांनी रक्‍तानेच लिहून ठेवले ४ चोर; साक्षात मृत्‍यू समोर असताना दाखवली हिंमत 

Last Updated: Feb 23 2021 10:47AM





पुणे : अशोक मोराळे 

सोसायटीच्या पार्किंगमधील कार चोरण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा चोरट्यांनी विरोध करणार्‍या मालकास धारधार चाकूने भोसकले. सोमवारी पहाटे ही घडली. या प्रकारानंतर दोन तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या व्यक्तीने त्यांच्या रक्तानेच चार चोरांनी हे कृत्य केल्याचे जमिनीवर लिहून ठेवले. साडेपाचच्या सुमारास सुरक्षारक्षक महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रमोद किसन घारे (वय 35, रा. सिद्धी संकल्प सोसायटी भुमकर चौक नर्‍हेगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शहरातील एका नामांकित कंपनीत उकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात. ही घटना सोमवारी (दि.22)  पहाटे पावने चारच्या सुमारास नर्‍हेगाव भुमकर चौक येथील सिद्धी संकल्प सोसायटीत घडली. या प्रकरणी घारे यांच्या पत्नी कोमल घारे (वय.29) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद घारे हे त्यांच्या कुटूंबियासह नर्‍हेगाव येथील सिद्धी संकल्प सोसायटीत वास्तव्यास आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ते त्यांच्या कुटूंबियांसह खडकवासला येथे फिरण्यासाठी गेले होते. पहाटे पावने चारच्या सुमारास पार्किंगमध्ये कसलातरी आवाज सुरू असल्याने प्रमोद यांना जाग आली. त्यांनी गॅलरीतून पाहिले त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या स्विफ्ट गाडीच्या दरवाज्याला झटत असल्याचे दिसले. प्रमोद यांनी खाली येऊन दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, चोरट्याने प्रमोद यांना मारहाण केली. त्यावेळी त्यांनी देखील चोरट्याचा प्रतिकार करण्यास सुरूवात केली. हा थरार सुरू असतानाच, चोरट्याच्या इतर तीन साथीदारांनी भिंतीवरून सोसायटीत उडी घेतली. इतर तिघा चोरट्यांनी देखील प्रमोद यांना मारहाण करत तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र प्रमोद यांनी धाडसाने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोरट्यापैकी एकाने धारधार चाकूने प्रमोद यांच्यावर हल्ला करत पोटात दोन वेळा चाकू खुपसला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. हल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रमोद जाग्यावरच कोसळे. तब्बल दोन तासापेक्षा अधिक कालावधी ते रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमरास सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या दमयंती ढकाल यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी प्रमोद यांच्या पत्नीला ही माहिती दिली. 

त्यानंतर त्यांनी खाली धाव घेऊन पाहिले असता, प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडलेला थरारा सांगितला. त्यानंतर सोसाटीतील नागरिक व प्रमोद यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.  घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख, पोर्णिमा तावरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. 

साक्षात मृत्यू समोर असताना त्यांनी दाखवली हिंमत

चोरट्यांनी भोकल्यानतंर प्रमोद घारे तब्बल दोन तासापेक्षा अधिक वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. कोणाची मदत मिळणे देखील त्यांना त्यावेळी शक्य नव्हते. त्यामुळे कदाचीत आपले काही बरेवाईट झाले तर आपल्यासोबत काय प्रकार झाला हे कोणाला समजणार नाही. म्हणून अशा कठीण प्रसंगात देखील त्यांनी रक्ताने जमिनीवर चार चोर लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनीच काढला होता पळ

एकीकडे शस्त्रधारी चोरटे समोर आल्याचे पाहून पळ काढल्याचा प्रकार शहरात घडला होता. यामुळे पोलिसांवर सर्वस्तरातून जोरदार टीका झाली. परंतू अशाच काही प्रसंगासारखा प्रसंग नर्‍हेगाव परिसरातील प्रमोद घारे यांच्यासोबत घडला. मात्र त्यांनी चोरट्यांना पाहून मागे न हटता, चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही जखमी झाल्यानंतर रक्ताने हा प्रकार चोरट्यांनी केला असल्याचे लिहून ठेवले.