Sun, Aug 09, 2020 10:54होमपेज › Pune › गर्भवतींनो अ‍ॅनेमियापासून राहा सावधान

गर्भवतींनो अ‍ॅनेमियापासून राहा सावधान

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:13AMपुणे : प्रतिनिधी
गर्भवतींमधील अ‍ॅनेमिया असण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या, तर राज्यात पुणे तिसर्‍या क्रमांकावर आहे. अ‍ॅनेमियाग्रस्त गर्भवतींना प्रसूतीच्या वेळी अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी गर्भवतींमधील अ‍ॅनेमिया कमी करणे ही आरोग्य विभाग आणि वैयक्तिक गर्भवतींवरील महत्त्वाची जबाबदारी आहे. एकूण गर्भवतींपैकी 60 टक्के गर्भवतींना अ‍ॅनेमिया असल्याचे आरोग्य विभागाकडे गेल्या एक वर्षाच्या झालेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले
आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांना काम करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणारा ऑक्सिजन ज्या लाल रक्तपेशींमधून मिळतो त्या लाल रक्तपेशींमधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजे अ‍ॅनेमिया होय. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण हे आठ ते नऊ टक्क्यांपेक्षा कमी होते. पोषण आहाराची व आहारामधील लोहाची कमतरता, कामाचा अतिरिक्त ताण, जंतुसंसर्ग, वारंवार होणारी प्रसूती, मासिक पाळीतील रक्तस्राव यामुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते. बदलत्या जीवनशैलीमुळे या आजारात गर्भवतींंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 
देशात राज्याचा चौथा क्रमांक 
केंद्रीय आरोग्य विभागाच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2017 ते मार्च 2018 या एका वर्षाच्या कालावधीत देशभरात 10 लाख 47 हजार अ‍ॅनेमियाचे रुग्ण आढळले. यामध्ये महाराष्ट्रात 78 हजार 143 गरोदर महिला अ‍ॅनिमियाने ग्रस्त असून देशभरात राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. तर प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश असून तेथे गर्भवतींमध्ये अ‍ॅनेमियाचे दोन लाख रुग्ण आढळले आहेत. 
पुणे तिसर्‍या क्रमांकावर
राज्यभरात गरोदर महिलांमध्ये अ‍ॅनेमियाचे प्रमाण 78,143 आहे. या रुग्णांपैकी शासकीय रुग्णालयांमध्ये 70 हजार तर खासगी रुग्णालयांत सात हजार रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 8 हजार 435, तर त्या खालोखाल मुंबईत 6 हजार, तर पुण्यात पाच हजार 700 गर्भवतींना हा आजार असल्याचे गेल्या वर्षीच्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. गरोदर महिलांमध्ये अनेमिया असल्याचे ग्रामीण भागातील प्रमाण 49.9 टक्के, तर शहरी भागात  48.5 टक्के आहे.
लक्षणे व उपाय
अशक्तपणा येणे, दम लागणे, थकवा येेणे, चक्कर येणे, ओठ व कधी चेहरा पांढरा पडणे ही अ‍ॅनेमियाची प्रमुख लक्षणे आहेत. वेळीच निदान व उपचार घेतल्यास तसेच पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात येऊन आजार बरा होऊ शकतो.

गर्भारपणाच्या काळात महिलांना व्हिटॅमिनची गरज वाढते आणि त्या प्रमाणात ते घेतले गेले पाहिजे. गर्भवतींना व्हिटॅमिनच्या गोळ्या शासकीय रुग्णालयात मोफत मिळतात. पण त्यांच्यामध्ये जागृती नसल्याने त्या काळजीपूर्वक घेत नाहीत. म्हणून अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे बाळाचे वजन कमी होणे, गर्भपिशवीत पाणी कमी भरणे, तर आईला पायावर, हातावर सूज येणे, हृदय बंद पडणे अशी गुंतागूंत निर्माण होऊ शकते. - डॉ. सुनील पाटील, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, ससून रुग्णालय