Tue, Jul 07, 2020 16:58होमपेज › Pune › #Women’sDayदेहूगावच्या पूजा बुधावले व सायली महारावची विशेष सायकल मोहीम

#Women’sDayदेहूगावच्या पूजा बुधावले व सायली महारावची विशेष सायकल मोहीम

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:20AMसध्या युवा पिढी विविध क्षेत्रांत आपले नशीब आजमावत असताना, शहरातील दोन युवतींनी मात्र ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’साठी पुढाकार घेत नवीन आदर्श घालून दिला आहे. देहूगाव येथील पूजा बुधावले व पुण्यातील सायली महाराव या युवतींनी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश समाजातील; तसेच देशातील कानाकोपर्‍यांपर्यंत पोचवा यासाठी सायकल मोहीम सुरू केली आहे.

‘बेटी बचाओ’ व ‘पोल्युशन फ्री इंडिया’साठी विशेष प्रयत्न पूजा ही देहूगावची आहे. ती टूर्स अँड ट्रॅव्हल एजंटचा डिप्लोमा करत आहे, तर सायली ही पर्वती येथील शाहू कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. सायकलिस्ट अजय पडवळ यांना ही सायकलवारी अर्पण केली असल्याचे सायलीने सांगितले. चार वर्षांपासून सायकलिंग करत असून, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानास त्यांनी मागील वर्षी 31 नोव्हेंबरला सुरुवात केली.

35 दिवस, चार हजार किलोमीटर अंतर व नऊ राज्ये असा प्रवास करत या दोघींनी 3 जानेवारी 2018 ला  काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकलवारी पूर्ण केली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ आणि ‘पोल्युशन फ्री इंडिया’ हे दोन ‘मेसेज’ त्या सायकलवारीतून देत आहेत.  या दोघींनीच काश्मीर ते कन्याकुमारी ही मोहिम कुणाच्याही पाठिंब्याशिवाय पार पाडली आहे. याकामी सायकली नव्हत्या तेव्हा शहरातील नंदू चव्हाण यांनी सायकली पुरवल्या. त्यानंतर मोहिमेला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासात त्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला.

दोघीच असल्या तरी भीती वाटली नाही. राजस्थानमध्ये पाऊस, पंजाबमध्ये धुके, तर केरळ व तमिळनाडूमध्ये खूप ऊन, यामुळे स्किन प्रॉब्लेम्स आले; परंतु या कामापुढे ते काहीच नव्हते, म्हणून हिमतीने या अडचणींचा सामना करत त्यांनी ही सायकलवारी पूर्ण केली. खूप प्रकारचे अन्नपदार्थ व वेगवेगळ्या भाषा, सकाळी सहा ते सायंकाळी चार या वेळात दिवसाला 120 ते 130 किलोमीटर प्रवास,  तर दिवसाला जास्तीत जास्त बारा तासांत 165 किलोमीटर असा प्रवास करत सायकलवर दहा किलो सामान लादून यांनी ‘बेटी बचाओ’ हा संदेश भारतातील विविध राज्यांत पोचवला. महाराष्ट्रात त्यांना विशेष पाठिंबा मिळाल्याचे त्या सांगतात.

पालकांनी मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे हा संदेश महिला दिनानिमित्त द्यावासा वाटतो. हा अनुभव खूप छान होता. यापुढे हे कार्य सायकलवारीद्वारे उर्वरित विविध राज्यांत; तसेच समाजातील तळागाळातील लोकांपर्यत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुटुंबीयांचा कायम पाठिंबा मिळतो. त्या जोरावर अनंत अडचणींवर मात करून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा  संदेश लोकांपर्यंत पोचवणार; तसेच प्रदूषणमुक्तीसाठी सायकल वापरा हाही संदेश लोकांना देत राहणार.  - सायली महाराव, सायकलिस्ट

- पूनम पाटील