होमपेज › Pune › शुऽऽऽ पथक झोपलेय..!

शुऽऽऽ पथक झोपलेय..!

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 1:21AMपुणे : हिरा सरवदे

राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर मोठा गाजावाजा करुन महापालिकेने सुरु केलेली कारवाईची मोहीम केवळ फार्स असल्याचे स्पष्ट होत आहे. दंडात्मक कारवाई सुरु झाल्यानंतर केवळ सहा दिवसांत 11 लाख दंड वसूल करणार्‍या महापालिकेचे पथक झोपले असल्याचे महिनाभरात झालेल्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या 16 मार्च रोजी झालेल्या बैठकीत राज्यात संपूर्ण बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. त्यानंतर 24 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा अद्यादेश काढला. अद्यादेश काढल्या तारखेपासून तीन महिने प्लास्टिक वस्तू न वापरण्यासंबंधी जनजागृती आणि जवळ असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली होती. हा दंड पाच हजारापासून 25 हजारापर्यंत केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरात प्लास्टिक न वापरण्यासंबंधी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक जप्त करणे व प्लस्टिकची विल्हेवाट लावण्यास मुदत देण्याची मोहिम हाती घेतली होती. 

जनजागृती करण्यासाठी आणि प्लास्टिकची विल्हेवाच लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर 23 जून पासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कारवाई पथकांनी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची काटेकरो अंमलबजावणी करत शहरात कारवाईची मोहिम राबविली. मोहिमेच्या पहिल्याच दिवसी 104 दंडाच्या पावत्या फाडून तब्बल 5 लाख 59 हजार 100 रुपये दंड वसुल करण्यात आला. तर 7 हजार 942 किलो प्लास्टिक, 75 किलो थर्माकोल जप्त करण्यात आले. ही कारवाई सुट्टीच्या दिवशीही शहरात सुरू ठेवण्यात आली होती. दंडात्मक कारवाईने व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरली होती. कारवाई शिथील करण्यासाठी शहरातील व्यावसायिकांनी महापालिकेवर मोर्चाही आणला होता. मात्र कारवाईची मोहीम धडाक्यात सुरू होती.

हि बंदी यशस्वी होणार असल्याचे चित्र दिसत असतानाच राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी 27 जून रोजी व्यावसायिकांच्या दबावाला बळी पडत बंदीतून काही वस्तूंना सुट देत शिथिलता घोषित केली. हिच शिथिलता यशस्वी होत असलेल्या संपूर्ण प्लास्टिक बंदीस मारक ठरली. दंडात्मक कारवाई सुरू केल्यानंकतर धुमधडाक्यात सुरू असलेली कारवाईची मोहीम शिथीलतेच्या घोषणेमुळे एकदम कमी झाली. दंडात्मक कारवाई ते शिथीलतेची घोषणा या सहा दिवसात करण्यात आलेली कारवाई आणि शिथीलता घोषीत केल्यानंतर पुढील एक महिन्यात करण्यात आलेली कारवाई यात ऐंसी ते नव्वद टक्के फरक पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवाई पथकाचीही राज्य शासनाने केलेल्या शिथीलमुळे गोची झाली आहे. याशिथीलतेमुळे व्यावसायिक खुलेआम प्लास्टिकचा वापर व विक्री करू लागले आहेत. कारवाई पथकाकडूनही म्हणावी तशी कारवाई केली जात नाही. कारवाईत नेते मंडळीचा हस्तक्षेत होत असल्याचा अनुभव विचारात घेऊन कारवाई करणे बहुतेकवेळा टाळले जात आहे. एकंदरीत पर्यावरण मंत्र्यांनी केलेली शिथिलतेची घोषणा प्लास्टिक बंदीचा बळी घेणारी ठरली आहे.