होमपेज › Pune › ‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ची सक्ती

‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ची सक्ती

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:25AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

‘स्वच्छ शहर सर्वेक्षण’ स्पर्धेत 4 हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ करणे बंधनकारक केले आहे. याबाबतचा आदेशच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि.21) काढला आहे; तसेच कर्मचार्‍यांना वेतन देयके सादर करताना ‘अ‍ॅप डाऊनलोड’ केल्याची माहितीही सादर करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 4 जानेवारीपासून स्वच्छ शहर सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे. या सर्वेक्षणातील महत्त्वाचा भाग ‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ करणे हा आहे. अधिकाधिक ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून त्याप्रमाणे ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून तक्रारी व त्यांचे संगणीक प्रणालीद्वारे निराकरण करण्याला गुणांकन आहे. हे गुणांकन मिळवून स्वच्छ भारत अभियानात 
शहराला चांगला क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.  त्यात ‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ करण्यासाठी नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन केले जात आहे. शहरात रॅली काढल्या जात आहेत.

महापालिकेच्या गुणांकनासाठी अगत्याचे असल्याने आणि ‘अ‍ॅप डाऊनलोड’ झालेला आकडा वाढविण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढविली आहे. महापालिकेतील अधिकारी, त्यांच्या कुटुंबीयांना ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करणे  बंधनकारक केले आहे. अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या मोबाईलमध्ये ‘अ‍ॅप डाऊनलोड’ झाले की नाही, हे बघण्याची जबाबदारी प्रत्येक विभागातील अधिकार्‍यांवर सोपविली आहे.

खातरजमा करून कर्मचार्‍यांची वेतन देयके जमा करताना लेखी स्वरूपात ‘अ‍ॅप डाऊनलोड’ केल्याचा अहवालही या अधिकार्‍यांनी सादर करायचा आहे; तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांनी मित्र परिवारातील सदस्यांना ‘स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड’ करण्याबाबत प्रेरित करावे.  ‘अ‍ॅप डाउनलोड’ करण्यासाठी तांत्रिक साह्य करावे. ही कार्यवाही येत्या 26 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे या आदेशात आयुक्त हर्डीकर यांनी म्हटले आहे. पूर्वी केवळ आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना सदर मोबाईल ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करण्याची सक्ती केली गेली होती.