Wed, Aug 12, 2020 09:37



होमपेज › Pune › ‘आरटीओ’ला बसतोय ‘हायटेक’ दलालांचा विळखा

‘आरटीओ’ला बसतोय ‘हायटेक’ दलालांचा विळखा

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:03AM



पिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सध्या  दललांचा विळखा पडलेला आहे. उप-प्रादेशिक कार्यालयात दिवसभरात अनेक नागरिक विविध कामांसाठी येतात. येथे येणार्‍या नागरिकांना या दलालांच्या पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. दलालगिरी संपवण्याकरिता अनेक वेळा फक्‍तघोषणाच करण्यात आल्या; परंतु कार्यवाही मात्र काही झालेली नाही. आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर समोर दिसतात ते  अलिशान चारचाकी वाहनात दुकाने थाटलेले दलाल.  या दलालांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होत असतानाही त्यांच्यावर कुठलीच ठोस करावाई होत नाही.

परिवहन मंडळाने नागरिकांना या दलालापासून  सुटका मिळावी म्हणून लर्निंग लायसेनसाठी ऑनलाईन सेवा सुरू केली, परंतु झाले उलटेच. दलालांनी  आपल्या सोईनुसार ते सर्व शिकून घेऊन ऑनलाईनमध्येही व्यवसाय तेजीत सुरू केला आहे. ऑनलाईन सुविधा सुरू झाल्यानंतर काही दिवस नागरिकांना लवकर लर्निंग लायसेन मिळत होती. काही दिवस दलाल कार्यालयातून गायब झाल्याचे चित्र होते; परंतु त्यावेळी काही नागरिकांनी भिती व्यक्‍त केली होती की, दलाल काही दिवसानी सर्व अपॉईंटमेटच्या तारखा फुल करतील. अगदी तसेच घडले आणि तीन ते चार महिन्याच्या पुढील तारीख नागरिकांना मिळण्यास सुरुवात झाली.

दलालांनी ऑनलाईन प्रक्रियेत फॉर्म कसा भरायचा हे शिकून घेऊन लॅपटॉप किंवा मोठे डेस्कटॉप खरेदी करून ऑनलाईन फॉर्म भरून देण्यास सुरूवात केली. ऑनलाईन फॉर्म भरण्यास सायबर कॅफेमध्ये सुमारे 100 रूपये आणि आरटीओ विभागाची 31 रुपयांची पावती ऐवढाच खर्च लागत असताना दलाल नागरिकांकडून सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत पैसे उकळत आहेत.  चालकांना  पक्केलायसेन काढण्यासाठी 311 रुपये ऐवढा खर्च येत असताना दलाल मात्र एक हजार रुपयांपर्यंत नारिकांकडून पैसे उकळत होते. 

आरटीओ विभागातील कर्मचार्‍यांचा आणि दलालांचा ऐकमेकांचे हातात हात असल्याने कर्मचारी नागरिकांची अडवणुक करून त्यांना दललाकडे जाण्यास भाग पाडत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
नागरिकांना छोट्या-छोट्या कारणाने अडवणुक करून लायसेन नाकरले जाते; परंतु तेच कागदपत्रे घेऊन जर दलालामार्फत गेले तर लायसेन मिळेते, परंतु यासाठी नागरिकांना मोठी रक्‍कम मोजावी लागते. वाहनांच्या पार्किंगमध्ये दलाल मंडळी सर्वत्र बसलेली असतात. काही दलालांनी चारचाकी वाहने खरेदी करून त्यामध्येच त्यांनी इंटरनेट सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिवसभर त्या गाडीत बसून ते व्यवसाय करतात. काही दलाल ईमारतीच्या तळमजल्यात असलेल्या पार्किंगमध्ये दुचाकी वाहनांवर बसून व्यवसाय चालवत आहेत.