Sun, Aug 09, 2020 02:59होमपेज › Pune › बंडखोरी व दुहेरीमुळे लढत रंगणार

बंडखोरी व दुहेरीमुळे लढत रंगणार

Last Updated: Oct 09 2019 10:52PM
पिंपरी-चिंचवड वार्तापत्र : जयंत जाधव

पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांत व वडगाव-मावळ विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी अर्ज भरेपर्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी घडत होत्या. पिंपरी-चिंचवड मतदारसंघात शिवसेना व भाजपच्या विरोधात; तसेच पिंपरीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी झाल्याने व भोसरीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवारास पुरस्कृत केले, तर चिंचवडमध्ये भाजपविरोधात अपक्षाच्या मागे सर्वपक्षीय मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. वडगाव-मावळमध्ये राष्ट्रवादीने ऐन वेळी भाजपच्या नगरेसवकालाच उमेदवारी दिली. या सर्व घडामोडींमुळे व युतीत आणि आघाडीत नाराजी नाट्य असल्याने चारही मतदारसंघांत दुरंगी लढत रंगणार आहे.  

मागील निवडणुकीत भाजप व शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढले होते; परंतु या वेळी भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडी आहे. मागील वेळी सत्ताधारी महाआघाडी विरोधात वातावरण होते. परंतु, या वेळी जागावाटपातील वादामुळे व महायुतीत स्थानिक पातळीवर अगोदरच एकोपा नसल्यामुळे पिंपरी व चिंचवडला शिवसेना व भाजपचे एकमेकांविरुद्ध बंडखोर उभे आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळी करीत शेवटच्या क्षणी चिंचवड व भोसरीत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व अपक्ष संलग्न आमदार महेश लांडगे या तगड्या भाजपच्या उमदवारांविरुद्ध एकास एक लढत देण्यासाठी अपक्ष अनुक्रमे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व माजी आमदार विलास लांडे या अपक्ष उमेदवारांमागे राष्ट्रवादीसह अन्य सर्व पक्षीयांची तकाद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.     

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन वेळी पहिल्यांदा नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर यांची उमेदवारी बदलत माजी आमदार आण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पिंपरीत रंगत वाढणार आहे; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ व नगरेसविका धर यांनी अपक्ष उमेदवारी भरून माघार घेतली आहे. तर, शिवसेनेचे उमेदवार आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात भाजपचे अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे  यांनी व आरपीआयच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनीही माघार घेतली आहे. पिंपरीत एकूण वैध 31 उमेदवारांपैकी 13 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रिंगणात 18 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या बनसोडे यांच्या विरोधात मीना खिलारे, तर शिवसेनेचे आ. चाबुकस्वार यांच्या विरोधात भाजप-आरपीआयचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, युवराज दाखले यांची बंडखोरी कायम आहे. तर, वंचित बहुजन विकास आघाडीचे बाळासाहेब गायकवाड, वंचितचे बंडखोर माजी नगरसेवक रामचंद्र ऊर्फ चंद्रकांत माने, बसपाचे धनराज गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे हेही रिंगणात असले तरी प्रमुख लढत आ. चाबुकस्वार व बनसोडे यांच्यातच होईल.  

चिंचवडमध्ये भाजपचे आ. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, अपक्ष कलाटे यांना पाठिंबा देण्यासाठी ही खेळी असल्याचा इन्कार करीत ए. बी. फॉर्म वेळेत न आल्याने आपला उमेदवारी अर्ज बाद झाला. पक्षाने आपल्याबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे आपण शहरकार्याध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, असे असले तरी आता कलाटे यांनी माघार न घेतल्याने आ. जगताप यांच्या विरोधात अपक्ष कलाटे अशी एकास एक लढत होणार आहे. राष्ट्रवादीला आ. जगताप यांना शह देण्यासाठी कलाटे यांच्या पाठीमागे ताकद उभी करणार व शिवसेनेसह सर्वच भाजपचे विरोधी पक्ष ऐन वेळी कलाटे यांचे काम करणार, अशी खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे युतीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 96 हजारांचे मताधिक्य असल्याने आ. जगताप यांना ही एकतर्फी वाटणारी लढतही रंगतदार होणार आहे. चिंचवडमध्ये वैध 14 उमेदवारांपैकी 3 जणांनी माघार घेतल्याने रिंगणात 11 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये बसपचे राजेंद्र लोंढे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अजित संचेती, शेकापच्या छायावती देसले यांचा समावेश आहे.  

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप-शिवसेना महायुतीमुळे आ. लांडगे यांनाही एकतर्फी वाटणारी ही निवडणूक त्यांचेच पारंपरिक विरोधक माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवारी भरत राष्ट्रवादीचाही पाठिंबा घेतल्याने रंगतदार झाली आहे. भोसरीत एकूण वैध 18 उमेदवारांपैकी नगरेसवक दत्ता साने, माजी नगरेसवक जालिंदर शिंदे आदी 6 जणांनी माघार घेतली. त्यामुळे रिंंगणात 12 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख, बसपचे राजेंद्र पवार, सपचे वहिदा शेख यांचा समावेश आहे. परंतु, खरी लढत आ. लांडगे व लांडे यांच्यातच रंगणार आहे. शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बुधवारी (दि. 4) झालेल्या बैठकीत ज्येष्ठ महिला पदाधिकारी व माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांच्यात झालेल्या हाणामारीमुळे भाजप उमेदवार आ. लांडगे यांना फटका बसण्याची शक्यता होती. परंतु, लांडगे यांनी त्याची काळजी घेत शनिवारी (दि. 5) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व सुलभा उबाळे आदी पदाधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन एकोपा केला. येत्या दि. 19 पर्यंत काय राजकीय खेळ्या होतात त्यावर या मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.  

वडगाव-मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार व कामगार राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्यात व सुनील शेळके, रवी भेगडे यांच्यात चुरस होती. ऐन वेळी बाळा भेगडे यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले. राष्ट्रवादीने खेळी करीत ऐन वेळी सुनील शेळके यांनाच उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. 4) शेळके यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत बाळा भेगडे यांना ही निवडणूक नेहमीप्रमाणे एकतर्फी नसल्याचे संकेत दिले आहेत. मावळात वैध 10 उमेदवारांपैकी 3 जणांनी माघार घेतल्याने 7 जण रिंगणात आहेत. यामध्ये वंचितचे रमेश ओव्हाळ, काँग्रसचे बंडखोर खंडू तिकोणे, बसपच्या मंदाकिनी भोसले आदींचा समावेश आहे. तर, रवी भेगडे यांनीही माघार घेत भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. शेळके यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीतून केवळ जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे नाराज आहेत. बुधवारी त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली. एकंदरीत बाळा भेगडे व सुनील शेळके यांच्यातील लढत राज्यात रंगणार, हे स्पष्ट झाले आहे.