Sun, Aug 09, 2020 10:40होमपेज › Pune › आता मधक्रांतीच्या दिशेने केंद्राचे पाऊल

आता मधक्रांतीच्या दिशेने केंद्राचे पाऊल

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:49AMपुणे : शंकर कवडे

नैसर्गिक झाडेझुडपे व पिके यातून मिळत राहणार्‍या फुलोर्‍यातून मधमाशांमार्फत देशात मधक्रांती होण्याच्या दिशेने केंद्रसरकारने पाऊल टाकले आहे. दुग्ध क्रांतीनंतर मध उत्पादनाकडे शेतकर्‍यांना आकर्षित करून उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने तब्बल 1 लाख 15 हजार अत्याधुनिक मधपेट्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत, जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 500 शेतकर्‍यांना या अत्याधुनिक मधपेट्यांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. 

शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये या अत्याधुनिक पेट्या दाखल झाल्या आहेत. आकर्षक घराच्या आकाराच्या असलेल्या नवीन मधपेट्यांमधील वातावरण नियंत्रित राहण्यासाठी पाच व्हेंटिंलेशन, ब्रूड चेंबर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापूर्वीच्या पेटीमध्ये केवळ दोन व्हेंटिलेशन देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत मधपेटीसह सातेरी जातीच्या मधमाशा, मध काढतेवेळी तोंडावर लावण्यात येणारी जाळी, धुर फवारणी, हातमोजे यासह पेटी ठेवण्यासाठी स्टॅण्ड देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी आलेल्या 1 हजार 500 मधपेट्यांपैकी प्रत्येकी दहा या प्रमाणे 150 शेतकर्‍यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

सद्य: स्थितीत लाकडी पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या जातात. या पेटीत दोन दालने असतात. एक खालचे वंश संगोपनाचे दालन (पिलाव्याची कोठी) आणि दुसरे वरचे जादा मध साठविण्याचे दालन असते. यामधील काढता घालता येणार्‍या लाकडी चौकटीत मधमाशा मेणाची पोळी बांधतात. दोन दालनांचे वर एक तळपाटावर असते व वर छप्पर असते. खालच्या दालनात मधमाशांचा वंश असतो व वरचे दालन सर्वस्वी मध साठविण्याकरिता वापरले जाते. या पोळ्यातून मधुनिष्कासक यंत्राच्या साहाय्याने मध काढून घेतल्यानंतर रिकामी झालेली पोळी पुन्हा भरण्यासाठी त्या दालनात परत ठेवली जात असल्याची माहिती केंद्रातील सहाय्यक निवृत्ती भिलारे व राजेंद्र आटपाडीकर यांनी दिली.

याबाबत बोलताना केंद्राचे सहाय्यक उपनिदेशकचे  (2)  हेमराज मुवेल म्हणाले, केंद्र सरकारने देशात श्‍वेतक्रांती बरोबर  मधक्रांती होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत मधप्रशिक्षण कोर्स केलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभधारक शेतकर्‍याला आधार कार्ड, प्रशिक्षण प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक आदी जमा करावे लागणार आहे. याखेरीज 1 हजार 500 रुपये डिपॉझिट स्वरुपात ठेवून याअतंर्गत एका वर्षात अपेक्षित उत्पन्न काढेल, याबाबच्या हमीपत्रावर मधपेट्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, उपक्रमाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍याला अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास त्याकडील मधपेट्या जमा करून त्या इतरांना मागणीनुसार देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.