Wed, May 12, 2021 02:13होमपेज › Pune › खडकवासला मॉडेलमुळे नवीन जलक्रांती : नितीन गडकरी 

खडकवासला मॉडेलमुळे नवीन जलक्रांती : नितीन गडकरी 

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:27AMखडकवासला : वार्ताहर

कर्नल सुरेश पाटील यांच्या अथक परिश्रमातून राबविण्यात येत असलेल्या खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या मॉडेलमुळे देशात नवीन जलक्रांती होणार असून, ही चळवळ खेडोपाडी पोहोचावी,  असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व जलसंपत्ती मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 

कर्नल सुरेश पाटील यांनी निवृत्त लष्करी अधिकारी तसेच   सेवा भावी संस्था तसेच सरकारच्या विविध विभागाच्या मदतीने खडकवासला धरणातील गाळ काढून विविध पर्यावरण उपक्रम राबविले आहेत. धरणातील गाळ काढण्यात आल्याने धरणातील पाणी साठयात वाढ झाली आहे.धरणाचे त्यामुळे एक प्रकारे पुर्नजीवन झाले आहे. या अभिनव उपक्रमावर  राज देशमुख यांनी लिहिलेल्या धरणांचे पुनरुज्जीवन  या  पुस्तकाचे प्रकाशन  नुकतेच पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी कर्नल सुरेश पाटील व त्यांच्या सहकारी निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचे कौतुक केले. 

निवृत्त लष्करी अधिकारी  एकत्रित येऊन सुरु केलेली पाणी चळवळ आता देशभर  व्यापक होत आहे.  कर्नल सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रीनथंब नामक संस्था पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्यांमध्ये धरणातील गाळ काढणे तसेच वृक्षारोपण करणे असे विविध उपक्रम राबवत आहे. याची माहिती  पुस्तकांत आहे. पालकमंत्री गिरीशजी बापट, ग्रीनथंब चे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरींनी ग्रीनथंब टीमच्या कामाचे कौतुक करताना राज्याच्या आणि देशाच्या इतर भागातही हा उपक्रम सुरु करण्याचे आवाहन केले. कर्नल सुरेश पाटील म्हणाले , 

लोकसहभागातून खडकवासला धरण पुनरुज्जीवन  हा  एक दिशादर्शक यशस्वी उपक्रम आहे.    जल संवर्धनातून राष्ट्रीय संपत्ती मध्ये भर घातली जाणार आहे. लाखो एकर पडीक जमिन लागवडी खाली येऊन शेतकरयांना लाभ मिळणार आहे. पर्यायावणाच्या रक्षणासाठी  अशा प्रकल्पाची गरज आहे.

ते  पुढे म्हणाले , माजी सैन्य अधिकारार्‍यांच्या मदतीने सुरु केलेले धरणातील गाळ काढण्याचे काम आता देशासाठी एक आदर्श  मॉडेल ठरत आहे. धरणातील गाळ काढून त्याचे शेतकर्‍यांना मोफत वाटप केल्याने धरणाच्या आजूबाजूचे शेतकरी आता जास्त उत्पन्न घेऊ लागले आहेत. पाणी चळवळ केवळ कागदावर न रहाता ती प्रत्यक्षात तळागाळात पोहोचण्यासाठी खडकवासला , खानापुर ,गोरहे ,ओसाडे ,आंबी आदी गावांतील धरणतीरावर विधायक  , पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यात आले आहेत. पुस्तकामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांचे  अभिप्राय आहेत. जलसवंर्धनातून प्रगत  राष्ट्र उभारणीचा  ध्यास घेऊन कर्नल सुरेश पाटील यांनी सुरु केलेली   पाणी चळवळ खेडो-पाडी पोहोचविण्यासाठी सरकारी यंत्रणा पुढे आली आहे.  भारतीय सैन्य दल ,  जलसंपदा विभाग,  वन विभाग , पुण्यातील गणेश मंडळे व कमिन्स इंडिया फौंडेशन, टाटा मोटर्स या सारख्या नामांकित कंपन्या खडकवासला उपक्रमात  सहभागी झाल्या आहेत.