Sun, Aug 09, 2020 11:17होमपेज › Pune › ‘पंडित’च्या कामगारांचा संघर्ष सुरूच

‘पंडित’च्या कामगारांचा संघर्ष सुरूच

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:32AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

प्रलंबित मागण्यांसाठी पंडित ऑटोमोटिव्ह कामगारांचे आंदोलन सुरू आहे. कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी तब्बल 35 दिवस कामगारांनी आंदोलन सुरू ठेवले आहे, तरीही कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप त्यांना दाद मिळाली नाही. उलट कामगारांवरच न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे कामगारांचा न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष अद्यापही चालूच आहे. 

ताथवडे येथील पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांचे आंदोलन सुरू आहे. 4 डिसेंबरपासून हे आंदोलन सुरू आहे.  कामगारांचा रखडलेला पगार कंपनी व्यवस्थापनाने दिलेला नाही. त्याच्या विरोधात कंपनीतील सुमारे 120 कामगार कंपनीतच बसून आंदोलन करत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना सुरू असलेली येण्या-जाण्यासाठी असणारी बस सुविधा बंद केली आहे. ती सुरू करावी, अशी मागणी कामगार करत आहेत.

जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत कंपनीतच बसून आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार उपायुक्‍तांनी मध्यस्थी करून बैठक बोलावली होती. 15,  16  व  27  डिसेंबर रोजी ही बैठक बोलावली होती. या  तिन्ही  बैठकांना  व्यवस्थापन  अनुपस्थित राहिले. त्यामुळे अद्यापही कामगारांच्या मागण्या प्रलंबितच राहिल्या आहेत. बैठकीकडे कंपनी व्यवस्थापन पाठ फिरवत असल्याने तोडगा निघत नाही.  

कंपनी कामगारांनी पाच महिन्यांपासून रखडलेले वेतन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. कामगारांचा पगार रखडलेलाच आहे. याच्या विरोधात ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस कर्मचारी संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली. कामगारांचा पगार वेळेत देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिला, तरीही कंपनीने आदेशाचा अवमान केला आहे. कंपनी व्यवस्थापनावर कारवाई होणार की नाही असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत.

कंपनीचा न्यायालयात दावा

पंडित ऑटोमोटिव्ह कामगारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मिटविण्यासाठी कामगार उपायुक्‍तांनी पुढाकार घेतला आहे; मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत आंदोलन करणार्‍या कामगारांच्या विरोधातच न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर कामगारांनी कंपनी बाहेरही आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.