Sat, Oct 24, 2020 08:02होमपेज › Pune › पुण्यात मृत्युदर २ टक्क्यांवर

पुण्यात मृत्युदर २ टक्क्यांवर

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात कोरोनाचा पहिला मृत्यू झाला, त्याला 29 आठवडे उलटले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत वाढत गेलेला मृत्यूदर आता घटतो आहे. मागील काही दिवसांपासून रोज नवीन कोरोना रुग्णांपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे.  सप्टेंबर महिन्यात 24 व्या आठवड्यात 8 टक्क्यांवर गेलेले मृत्यूचे प्रमाण 28 व्या आठवड्यात कमी होऊन 2 टक्के एवढे झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या अहवालात 28 वा आठवडा, म्हणजेच 8  ते 14 ऑक्टोबर दरम्यान 165 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, हे प्रमाण आतापर्यंतच्या मृत्यूच्या 2 टक्के एवढे आहे. तर 24 व्या आठवड्यात (10 ते 16 सप्टें.) 635 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या 8.7 टक्के एवढे होते. त्यानंतरच्या आठवड्यातील मृत्यूचे प्रमाण 7 पॉइंटने कमी होऊन 8 टक्के एवढे राहिले; तर 26 व 27 व्या आठवड्यात अनुक्रमे 6.3 टक्के असे मृत्यूचे प्रमाण कमी होत गेले. 

पुण्यातील सर्वाधिक मृत्यू हे 61 ते 70 वयोगटातील झाले आहेत. या वयोगटातील आतापर्यंत 2,209 जणांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण एकूण मृत्यूच्या 30 टक्के एवढे आहे. त्याखालोखाल 51 ते 60 या वयोगटातील 1,613 जणांचा मृत्यू झाला असून, त्याचे प्रमाण 22 टक्के आहे. 71 ते 80 वयोगटातील 1,568 जणांचा, 41 ते 50 वयोगटातील 876, 81 ते 90 वयोगटातील 477, 31 ते 40  वयोगटातील 383 जणांचा मृत्यू झाला आहे.

561 नवे रुग्ण : 23 जणांचा मृत्यू 

पुण्यात रविवारी कोरोनाचे 561 नवे रुग्ण आढळले. त्यात पुणे शहरातील 366 तर पिंपरी-चिंचवडमधील 195 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुणे शहर 19 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 4 अशा एकूण 23 बाधितांचा मृत्यू झाला. पुणे शहरात रविवारी आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणीसाठी 3,066 संशयितांचे नमुने घेण्यात आले. आतापर्यंत 7,02,124 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याचबरोबर दिवसभरात बरे झालेल्या 698 रुग्णांना डिस्चार्ज दिला.आतापर्यंत 1,43,927  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत 9,507  सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2,276 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. सध्या 821 रुग्ण गंभीर असून त्यापैकी 438 अत्यवस्थ व्हेंटिलेटरवर आहेत. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 3,983 वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नवे 195 रुग्ण आढळून आले. बाधितांची एकूण संख्या 85,518 झाली आहे. सक्रिय 1,948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1,704 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. कोरोनातून 263 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची संख्या 81,370 झाली आहे, तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. 

 "