Sat, Sep 19, 2020 17:46होमपेज › Pune › प्रसंगी कर्ज काढून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करू : चंद्रकांत पाटील

प्रसंगी कर्ज काढून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करू : चंद्रकांत पाटील

Published On: Aug 14 2019 3:00PM | Last Updated: Aug 14 2019 3:13PM

संग्रहित छायाचित्रपुणे : प्रतिनिधी 

सांगली, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील हजारो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पडझड झालेल्या घराची दुरुस्ती व पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी केंद्र शासनाकडे सहा हजार 800 कोटी रुपयांची करण्यात आली आहे. केंद्राकडून आवश्यक निधी मिळाला नाही, तर राज्य शासन वेळप्रसंगी कर्ज काढून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करेल, अशी माहिती महसूलमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, बुधवारी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रकांत पाटील यांनी विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरातून ४ लाख ५३ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यासाठी एनडीआरएफ, नेव्ही, मिल्ट्री, कोस्टगार्ड आदी विभागातील जवानांची मोठी मदत झाली. पुरातून बाहेर काढलेल्या नगरिकांना राहण्यासाठी 500 च्या वर निवार केंद्र उभारण्यात आले असून, त्यामध्ये ३ लाखांपेक्षा जास्त लोक राहत आहेत. पुराचा फटका बसलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ज्या गावांना भविष्यातही पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशा गावांचे पूर्णपणे पुनर्वसन केले जाणार आहे. 

मंगळवारपासून रोख पाच हजार रुपये देण्यास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी अंदाजे दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 हजार 800 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. यापैकी किती निधी केंद्राकडून मिळतो, हे आता सांगता येणार नाही. आवश्यकतेपेक्षा कमी निधी मिळाल्यास राज्य शासन वेळप्रसंगी कर्ज काढून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करेल, अशी माहिती पाटील यांनी दिली.