Mon, Aug 10, 2020 05:14होमपेज › Pune › स्पर्धेमुळे वैद्यकीय व्यवसायात अपप्रवृत्ती

स्पर्धेमुळे वैद्यकीय व्यवसायात अपप्रवृत्ती

Published On: Dec 18 2017 2:40AM | Last Updated: Dec 18 2017 2:08AM

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

तज्ज्ञ डॉक्टरांची वाढती स्पर्धा, कार्पोरेट रुग्णालयांमध्ये उद्योजकांनी केलेली गुंतवणूक आणि धर्मादाय कम कार्पोरेट रुग्णालये जशी उभी राहू लागली तसा खासगी वैद्यकीय व्यवसायात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला. त्यामुळे सुरुवातीला उदात्त समजला जाणारा हा पेशा धंदा बनला, अशी माहिती जुन्या काळातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.

1975 च्या दशकात पुण्यात छोटे दवाखाने म्हणजेच ‘नर्सिंग होम’ नावाचा प्रकार होता. हे नर्सिंग होम तीन ते चार खाटांचे असत आणि बहुदा नवरा-बायकोच चालवत. तर ग्रामीण भागात वैद्य, दवाखाने असत. सुरुवातीला वैद्यकीय पदवी घेतलेले म्हणजे एमबीबीएस व इतर कोर्सेस झालेले जनरल प्रॅक्टिशनर्स (जीपी) हेच रुग्णांसाठी अंतिम डॉक्टर असत. जीपी रुग्णांवर किरकोळ शस्त्रक्रिया व इतर उपचार करत. त्यावेळी पुण्यात दोन ते तीन मोठी खासगी पण धर्मादाय रुग्णालये होती. पण तेथील उपचार हे श्रीमंतांनाच परवडत असत. 

वैद्यकीय शिक्षणाच्या कक्षा जशा रुंदावू लागल्या तसे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले म्हणजेच मास्टर ऑफ सर्जरी आणि मास्टर ऑफ मेडिसीन (एमडी) असे तज्ज्ञ डॉक्टर निर्माण झाले. 1985 - 90 च्या काळात त्यांना ‘तज्ज्ञ’ म्हणून संबोधले जात असे. जर जीपींकडे एखाद्या रुग्णाचे उपचार झाले नाही तर ते या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवू लागले. जशी - जशी तज्ज्ञांची संख्या वाढू लागली तशी त्यांच्यामध्ये रुग्ण मिळविण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आणि तो रुग्ण आपल्याकडेच पाठवला जावा यासाठी कमिशनच्या रूपात म्हणजेच ‘कट प्रॅक्टिस’ वाढू लागली. याआधीही हा प्रकार सुरू होता. पण तो थोड्या प्रमाणात होता, अशी माहिती एका सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. पण वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार वाढत गेला आणि रुग्णाला सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार देण्यासाठी रुग्णालय हवे असे डॉक्टरांना वाटू लागले. पण एकटा डॉक्टर त्यावेळी कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णालये बांधू शकत नव्हता. त्यावेळी मग ‘ट्रस्ट’ स्थापन करू न त्याद्वारे मोफत शासकीय जमीन, विविध संस्थांकडून लाखोंच्या देणग्या मिळवून टोलेजंग हॉस्पिटल इमारती बांधल्या गेल्या. महागडी उपकरणे आणली. पदव्युत्तर शिक्षण झालेले तज्ज्ञ डॉक्टर कामे करू लागले. त्याचप्रमाणे उद्योगपतींंनीही स्वतःचा पैसा खर्च करून अशी कार्पोरेट रुग्णालये उभारली आणि तेथे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना कामाला ठेवून त्यांच्याद्वारे काही डॉक्टर आणि व्यवस्थापन पैसे कमवू लागले.