Mon, Sep 21, 2020 12:04होमपेज › Pune › खासदार बारणेंच्या राजकीय खेळ्यांमुळे मावळात रंगत

खासदार बारणेंच्या राजकीय खेळ्यांमुळे मावळात रंगत

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:43PMपिंपरीः नंदकुमार सातुर्डेकर 

मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे  यांच्या प्रयत्नांतून क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशन रविवारी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेऊन त्यांनी संघ परिवाराला व भाजपातील जुन्या निष्ठावतांना खुश केले.  भाजपकडूनच स्वतःचे ब्रँडिंग करून घेतले.  पक्षांतर्गत विरोधकांनाही योग्य तो संदेश दिला.    

एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या त्यांच्या राजकीय खेळयांमुळे भविष्यात या मतदारसंघात चांगलीच रंगत येणार आहे.  सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत  सेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्याने  तत्कालीन खासदार गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले. त्यांनी शेकापच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या आ.  लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली. मात्र निवडणुकीत बारणे विजयी झाले. पुढे आ.  जगताप यांनी विधानसभेला भाजपचा झेंडा हाती घेतला.   चिंचवडमधून त्यांनी विजयही मिळवला. काँग्रेसचे  रामशेठ ठाकूर, राष्ट्रवादीचे आझम पानसरे,सेनेचे गजानन बाबर यांचाही भाजपात प्रवेश झाला.

मावळ मतदारसंघात  सहा विधानसभा मतदारसंघ येतात  पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, मावळात बाळा भेगडे, चिंचवडला लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार  आहेत, तर कर्जतला राष्ट्रवादीचे सुरेश लाड, उरण व पिंपरीत सेनेचे अनुक्रमे मनोहर भोईर व गौतम चाबुकस्वार निवडून आले आहेत. पिंपरी पालिका, पनवेल, लोणावळा, तळेगाव नगरपरिषद ही सत्तास्थाने भाजपाच्या हातात आहेत.  सेनेचे खा.  बारणे यांचे काम चांगले आहे.  मात्र या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद ही खा. बारणे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. युतीची शक्यता गृहीत धरून  त्यांनी  भाजपच्या नेत्यांशीही चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यांनी मागे लालकृष्ण अडवानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने ते भाजपात जाणार, अशी चर्चा झाली; मात्र त्यांनी ही चर्चा  फालतूपणा, भाजपमधील काही मंडळींचे षड्यंत्र असल्याचे सांगितल्याने चर्चा थांबली.

लोकसभा निवडणुकीत सेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपतर्फे  आ. लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे व प्रशांत ठाकूर यांची नावे जोरदार चर्चेत आहेत. मात्र खा. बारणे यांच्या खेळ्यांनी राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने टपाल तिकिटाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते व गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत घेऊन बारणे यांनी स्वतःचे ब्रँडिंग करून घेतले आपल्या कार्यकाळात  केलेल्या  विविध विकासकामांचा उल्लेख केला.  

आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही भराव टाकून इमारती बांधल्या नाहीत की गुन्हेगारही पोसले नाहीत या शब्दात त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यावर शब्दबाणही सोडले सभापती महाजन यांनी बारणे यांची लोकसभेत प्रश्न मांडण्यासाठी चालणारी धडपड , त्यांची चिकाटी या गुणांचा उल्लेख भाषणात केल्याने बारणे यांचे भाजपकडूनच चांगले ब्रँडिंग झाल्याची चर्चा उपस्थितात होती.