Mon, Mar 08, 2021 17:26
मराठी साहित्य संम्मेलन ः मराठी साहित्यविश्वात विज्ञानकथेला नवा आयाम देणारे डाॅ. जयंत नारळीकर

Last Updated: Jan 24 2021 7:32PM
पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठी साहित्यविश्वात विज्ञानलेखक म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाणे घेतलं जातं ते म्हणजे डाॅ. जयंत नारळीकर. त्यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मराठी साहित्यात विज्ञानकथा म्हटलं की, आपसूकच जयंत नारळीकर चं नाव समोर येतं. विज्ञान हा विषय आपल्या वाचकांना रोचक पद्धतीने समजून सांगणारे जयंत नारळीकर यांच्याविषयी जाणून घेऊ या...

जयंत विष्णू नारळीकर असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा कोल्हापुरमध्ये १९ जुलै १९३८ साली जन्म झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ होते. जयंत नारळीकरांना गणिताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांच्या वडिलांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुखपदाची जबाबदारीदेखील पार पाडली आहे. आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या, त्यामुळे सहाजिकच संस्कृतवर डाॅ. नारळीकरांची पकड मजबूत झाली.

 डाॅ. नारळीकर यांचा शैक्षणिक व संशोधन प्रवास 

वडील वाराणसीला नोकरीला असल्याने डाॅ. नारळीकरांनी शालेय शिक्षणही वारणसीमध्येच झाले. तेथूनच त्यांनी १९५७ साली गणित या विषयात बीएसस्सी म्हणजे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या परिक्षेत डाॅ. नारळीकर प्रथम क्रमांकाने पास झाले होते. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी डाॅ. नारळीकर ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठामध्ये गेले आणि बी.ए, एम.ए आणि पीएचडी अशा पदव्या मिळविल्या. इतकंच नाही तर, रॅंग्लरही पदवी मिळवली, तसेच टायसन पदकही त्यांनी मिळाले. 

डाॅ. नारळीकरांनी पीएचडीचे मार्गदर्शक प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हाॅई़ल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. डाॅ. नारळीकरांची विद्वत्ता पाहून सर हाॅईल प्रभावित झाले होते. हाॅईल यांनी केंब्रिजमध्ये १९६६ मध्ये सुरू केलेल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ थिऑराॅटिकल एस्ट्राॅनाॅमी' स्थापना केली, त्यामध्ये डाॅ. नारळीकरांनी महत्वाचा वाटा आहे. इतकंच नाही, तर सर हाॅईल आणि नारळीकरांनी एकत्रित पणे गुरुत्वाकर्षणावर संशोधन केले आणि एक सिद्धांत मांडला. 'हाॅईल-नारळीकर सिद्धांत' म्हणून जगप्रसिद्ध आहे. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सिद्धांताशी साम्य असणारा हा सिद्धांत आहे. हाॅईल-नारळीकर सिद्धांतामध्ये असं सागितलं आहे की, "वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तुतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते', असा सिद्धांत दोघांनी मांडले आहे. डाॅ. नारळीकर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमविल्यानंतर १९७२ साली भारतात परतले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे  प्रमुख म्हणून रुजू झाले. काही कालावधीनंतर १९८८ साली पुण्यातील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

डाॅ. जयंत नारळीकर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेतच, मात्र त्यांनी मराठी साहित्यात आपल्या लिखानाने घातलेली मोलची भर मराठी साहित्यविश्वाला आणखी समृद्ध करून गेली. मराठी साहित्यात विज्ञानकथांना चालना देण्याचं काम प्रामुख्याने डाॅ. नारळीकरांनी केलं. अगदी सामान्यांना समजतील अशा विज्ञानकथा त्यांनी मराठी भाषेत लिहिल्या. 'यक्षांची देणगी' हे पुस्तक मराठी साहित्यात अत्यंत महत्वाचे मानले जाते. या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर याही उत्तम लेखिका आहेत. 'नभात हसते तारे' हे पुस्तक डाॅ. नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी लिहिलेले आहे. 

डाॅ. नारळीकरांची साहित्यसंपदा

अंतरातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला आणि व्हायरस, अशी विज्ञानकथांची पुस्तके त्यांनी लिहिली. अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती-जमती, नभात हसरे तारे,  नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, फॅक्ट्स अॅण्ड स्पेक्युलेशन इन काॅस्मोलाॅजी, युगा-युगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानांची, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेचे अवखल वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, समग्र जयंत नारळीकर, सूर्याचा प्रकोप, अशी विज्ञानावरील पुस्तके लिहून मराठी साहित्य विश्वात मोलाची भर डाॅ. जयंत नारळीकरांनी घातली आहे. 

डाॅ. नारळीकरांना मिळालेले मान-सन्मान

डाॅ. नारळीकरांचे 'चार नगरांतले माझे विश्व' हे आत्मतरित्र प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर डाॅ. विजया वाड यांनी डाॅ. नारळीकरांचे 'विज्ञानयात्री डाॅ. जयंती नारळीकर' चरित्र लिहिलेले आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, भटनागर पुरस्कार, एम.पी बिर्ला पुरस्कर, अशा अनेक नामांकित पुरस्काराने त्यांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या आत्मचरित्राला दिल्लीचा साहित्य अकदमी पुरस्कारही मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनने सन्मानही डाॅ. नारळीकरांना मिळालेला आहे. त्याचबरोबर १०९६ युनेस्केने 'कलिंग' पारितोषिकाने गौरविले आहे.