Sun, Aug 09, 2020 11:16होमपेज › Pune › मावळात मराठा क्रांती मोर्चाचा ‘चक्काजाम’ 

मावळात मराठा क्रांती मोर्चाचा ‘चक्काजाम’ 

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:47PMपुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्ग, तळेगाव-चाकण मार्गावर ‘रास्ता रोको’

मावळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 9) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मावळातील वडगाव, लोणावळा शहर व परिसर, तळेगाव, देहूरोड, कामशेत, पवनानगर, कार्ला, इंदोरी, शिरगाव तसेच सोमाटणे फाटा परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळात ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोखून धरत चक्कजाम आंदोलन केले. आंदोलकांनी पुणे- मुंबई महामार्ग, दु्रतगती मार्ग, तळेगाव-चाकण रस्ता येथे चक्काजाम केले. बंददरम्यान मावळ परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही; तसेच पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत बंदला गालबोट न लागता बंद शांततेत पार पडला. 

वडगाव मावळ येथे 1 ऑगस्टला क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या बंदच्या आंदोलनाची नियोजनाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील नियोजनानुसारच मावळ तालुक्यात सर्वत्र आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले. मावळ बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. 9) सकाळपासूनच वडगाव शहरातील व्यापारी व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. कान्हेफाटा परिसरातही दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे गावोगावचे युवक कार्यकर्ते उर्से टोलनाका, कान्हेफाटा, तळेगाव स्टेशन या ठिकाणी दुचाकी रॅलीद्वारे जमा झाले.उर्से टोलनाका येथे सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात झाली, वडगाव, तळेगाव दाभाडे, सोमाटणे, पवनमावळ भागातून दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी ‘रास्ता- रोको’ आंदोलन करुन द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.

सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी टोलनाक्यासमोर ठिय्या मांडला तर काहीवेळ भजनही केले. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यानंतर टोलनाक्याच्या परिसरात सगळीकडे भगवे झेंडे आणि मराठा मोर्चाचे कार्यकर्ते दिसत होते. आंदोलनकर्त्यांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. पोलीसांनीही दक्षता म्हणून टोलनाक्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावरच वाहने रोखून ठेवली होती; तसेच विशेष पोलीस फोर्ससह चोख बंदोबस्तही ठेवला होता. कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत शांततेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी केले. त्यामुळे सुमारे 2 हजार कार्यकर्त्यांचा जमाव असताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. एकंदर उर्से टोलनाका येथे द्रुतगती महामार्ग, कान्हेफाटा येथे पुणे-मुंबई महामार्ग व तळेगाव स्टेशन येथे सिंडीकेट बँकेसमोरील चौकामध्ये तळेगाव-चाकण रस्ता रोखून धरल्याने संपूर्ण मावळ तालुक्यात ‘चक्काजाम’ झाला होता. आंदोलनकर्त्यांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्ग सुमारे आठ तास रोखून धरला होता. त्यामुळे नेहमीच्या वर्दळीच्या महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कान्हे फाटा येथे रास्ता रोको दरम्यान, कान्हे, कामशेतसह आंदरमावळ भागातील टाकवे बु., वडेश्‍वर, नागाथली, खांडी, सावळा, कशाळ, भोयरे परिसरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सकाळी 9 वाजताच कान्हे फाटा येथे मुंबई-पुणे महामार्ग रोखला. यावेळी आंदरमावळ भागातून आलेल्या भजनी मंडळांनी दिवसभर महामार्गावरच भजन सुरू ठेवले होते.

आठवडे बाजार बंद 

महाराष्ट्र बंदला पाठिंबा म्हणून वडगाव मावळ येथील गुरुवारचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधाही सकाळपासूनच बंद करण्यात आली होती. त्यामुळे अफवांना आळा बसला आणि आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान, दि. 26 जुलै रोजी मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव-तळेगाव फाटा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या वडगाव शहरातील अफताब सय्यद या युवकाने आजही उर्से टोलनाका येथे स्वत: उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला.

लोणावळ्यात हजारो कार्यकर्ते रस्त्यावर

मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला लोणावळा आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. आरक्षणाची मागणी करीत रस्त्यावर उतरलेल्या येथील हजारो कार्यकर्त्यांनी लोणावळा रेल्वे स्थानकात जाऊन ‘रेल रोको’ करीत सुमारे 15 मिनिटे कोईमतूर एक्सप्रेस रोखून धरली. तर महिलांनी रस्त्यावर चूल मांडत जेवण तयार करून आंदोलकांना खाऊ घातले. काही युवकांनी सरकारचा निषेध करीत आपले मुंडण करवून घेतले.

लोणावळा शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील सर्व दुकानदार, पेट्रोल पंप धारक,  हॉटेल व्यावसायिक तसेच अन्य व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी मराठा मोर्चाच्या मागणीला आपला 100 टक्के पाठिंबा देत आपले व्यवसाय गुरुवार (दि.9) सकाळपासून बंद ठेवले. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली होती. शहरातून जाणारा द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर या बंददरम्यान वाहतूक तुरळक झाली होती. त्यामुळे नेहमीच वर्दळीच्या या मार्गावर अगदी शुकशुकाट जाणवत होता.

महाराष्ट्र बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या लोणावळा आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील हजारो कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली. सदर रॅली मावळा पुतळा चौक, कुमार रिसॉर्ट, मिनू गॅरेज चौक ते पुढे एस.टी. स्टँड आणि नंतर लोणावळा रेल्वे स्थानकात नेण्यात आली. याच ठिकाणी दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणार्‍या कोईमतूर एक्सप्रेसला रोखून धरले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर 15 मिनिटांनी एक्सप्रेस आंदोलकांनी जागेवरून हलू दिली. मात्र त्यानंतरही आंदोलक सुमारे तासभर रेल्वेच्या ट्रॅकवरच ठाण मांडून उभे राहिले. अखेर संयोजक आणि पोलिसांनी समजावल्यावर हे आंदोलक रेल्वे स्थानकातून बाहेर पडले.

स्थानकातून बाहेर पडलेल्या आंदोलकांनी आपला मोर्चा पुन्हा छत्रपती शिवाजी चौकात वळविला आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत ठाण मांडून बसले. दरम्यान याठिकाणी महिला आंदोलकांनी रस्त्यावरच चूल मांडून जेवण तयार करून आंदोलकांना खाऊ घातले. यातून या महिलांनी आमच्या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर आपला संसार थाटू, असा इशारा सरकारला दिला. तर काही आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवित या सरकारचा दहावा आम्ही घालीत आहोत, आशा घोषणा देत स्वतःचे मुंडणकरून घेतले. आंदोलनाच्या उत्तरार्धात आंदोलकांनी रस्त्यातच भर पावसात टाळ, मृदुंगाच्या साथीत भजन करीत सरकारचा निषेध केला.