होमपेज › Pune › देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वलस्थानी

देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वलस्थानी

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 1:13AM- ऊस गाळप 1806 लाख टन; साखर उत्पादन 187 लाख टन 
* गाळप आणि उत्पादनात उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानी 
* कर्नाटक, गुजरात आणि पंजाबमध्ये उत्पादन चांगले
* महाराष्ट्रातील उत्पादन वाढीने एकूण उत्पादन वाढणार

पुणे ः प्रतिनिधी

देशात 1 हजार 806 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 10.35 टक्के सरासरी साखर उतार्‍यानुसार 187 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे. राज्यनिहाय उत्पादनाची आकडेवारी पाहता 77.66 लाख टन साखर उत्पादन घेऊन महाराष्ट्राने अव्वलस्थान पटकावले आहे. तर 66 लाख टन उत्पादन घेऊन उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानावर असल्याचे केंद्राच्या ताज्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय साखर संचालक कार्यालयाकडून 19 फेब्रुवारीअखेर देशात झालेल्या ऊस गाळपाची आकडेवारी येथील साखर आयुक्तालयास पाठविण्यात आली आहे, त्यातील माहितीनुसार हे चित्र स्पष्ट झालेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी असून उत्तरप्रदेश दुसर्‍या स्थानावर आहे. त्या खालोखाल कर्नाटक, गुजरात आणि पंजाब राज्यात उसाचे अधिक गाळप झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात 692.89 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 77.66 लाख टनाइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. आठ दिवसांतील उत्पादनाचा हा आकडा आणखी वाढलेला असल्याचेही आयुक्तालयातून सांगण्यात आले. 

उत्तरप्रदेशात 635.65 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 66.11 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखरेचा सरासरी उतारा 10.40 टक्के हाती आलेला आहे. उत्तरप्रदेशमध्ये चालूवर्षी 100 लाख टनाहून अधिक उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज हंगाम सुरू होताना वर्तविण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात 73.40 लाख टनाचा साखरेचा सुरुवातीच्या उत्पादनाचा अंदाज मागे पडला असून 90 लाख टनापर्यंत उत्पादनात मुसंडी मारली जाईल, असे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आघाडी आणखी किती दिवस टिकणार हे चित्रही लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. मात्र, देश पातळीवर सुरुवातीला सुमारे 250 लाख टनाइतके साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामध्ये निश्‍चितच वाढ होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

कर्नाटकात 213.14 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 9.99 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 21.30 लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. त्या खालोखाल गुजरामध्ये 60.81 लाख टन ऊस गाळप, 5.86 लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. तर पंजाबमध्ये 46.30 लाख टन ऊस गाळपातून 4.20 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले आहे. अन्य राज्यांतील ऊस गाळप तुलनेने कमीच असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.