Wed, Aug 12, 2020 12:10होमपेज › Pune › पुणे : ‘एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलल्या, ‘या’ आहेत नव्या तारखा

पुणे : ‘एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलल्या, ‘या’ आहेत नव्या तारखा

Last Updated: Mar 22 2020 9:27PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ५ एप्रिलला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा २६ एप्रिल आणि संयुक्त परीक्षा १० मे रोजी होणार असल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

परीक्षांच्या तारखांतील बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. त्यात शाळा-महाविद्यालये, वसतिगृहे-अभ्यासिका बंद करण्यात आल्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार आपापल्या गावी परतले आहेत. राज्यात उद्भवलेली स्थिती विचारात घेऊन ५ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थी तसेच विविध संघटनांकडून करण्यात येत होती. आमदार रोहित पवार यांच्या सह अन्य आमदारांनी या मागणीचे समर्थन करत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागण्यांची दखल आयोगाकडून घेण्यात आली आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ५ एप्रिलला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा २६ एप्रिल आणि संयुक्त पूर्व परीक्षा १० मे रोजी घेतली जाणार आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना विचारात घेऊन परीक्षेच्या आयोजानासाठीचा फेरआढावा घेतला जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.