होमपेज › Pune › खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास

खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्यासाठी या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा देखील विकास होईल. कारण खेड्याचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे, असे मत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सल्लागार श्‍वेता शालिनी यांनी व्यक्त केले.

विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व सोशल रिस्पॉन्सिबीलीटी समूहाच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न पुरस्कार व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले टि.म.वि.च्या समाजकार्य विभागाचे डॉ. प्रकाश यादव, सी. एस. आर. सदस्य प्रदीप तुपे, ससूनचे समाजकार्य अधीक्षक सत्यवान सुरवसे, सोशल रिस्पॉन्सिबीलीटी मुख्य संयोजक शेखर मुंदडा, सोशल सिस्पॉन्सिबीलीटीचे अध्यक्ष विजय वरुडकर आदी उपस्थित होते.  

श्‍वेता शालिनी म्हणाल्या, भारतातील 50% जि. डी. पी. हा खेड्यांमधून येतो. खेड्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवित आहेत. खेड्यांमधील लोकांचे सबलीकरण होण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वनराईचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल पाटील, गणेश बाकले, वैभव मोगरेकर, प्रशांत खांडे, सुरज पोळ, रत्नाकर कोष्टी, अमोल उंबरजे, विजय दरेकर, संदिप फुके, राज देशमुख, शशी काटे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रिती काळे, डॉ. मनीषा दानाने, वसुधा देशपांडे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.