Tue, Jul 07, 2020 19:31होमपेज › Pune › वर्षातच पडू लागली नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने

वर्षातच पडू लागली नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:45AMपुणे : हिरा सरवदे

महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या माननीयांना वर्षभरातच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधून आमदारकीसाठी उतावीळ झालेले नगरसेवक कार्यकर्त्यांची नावे पुढे करून शहरभर भावी आमदार म्हणून फ्लेक्सबाजी करत आहेत. विशेष म्हणजे ही फ्लेक्सबाजी करणार्‍यांमध्ये ‘लाटे’वर निवडून येऊन पहिल्यादांच महापालिका सभागृहात प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे प्रमाण जास्त आहे.

महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात येऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. नगरसेवकपदाला वर्षपूर्ती झाल्यानंतर बोटावर मोजता येईल एवढ्यांनीच वर्षभरात केलेल्या कामांचा अहवाल छापला; तर अनेकांनी वर्षभरात काय काम केले, हे सांगणे बाजूला ठेवून ‘यशस्वी वर्षपूर्ती’ असा मजकूर असलेली फ्लेक्सबाजी करण्यात धन्यता मानली. सत्ताधारी नगरसेवकांनी तर वर्षपूर्तीला उत्सवाचेच स्वरूप दिले होते. सध्या पालिका सभागृहामध्ये नवीन सदस्यांची मोठी संख्या आहे. वर्षपूर्ती झाल्यानंतरही अनेकांना सभागृहाच्या आणि पालिकेने करावयाच्या कामांची पुरेशी माहिती नाही; त्यामुळे सभागृहात पक्षाची आणि पक्षातील नवख्या नगरसेवकांची बाजू सांभाळण्याची जबाबदारी त्या त्या पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांवर येऊन पडली आहे.  

असे असले तरी पालिकेच्या कामकाजाची अद्याप पुरेशी माहिती न झालेल्या आणि लाटेवर निवडून अलेल्या नवख्या नगरसेवकांना वर्षभरात ‘आमदारकी’ची स्वप्ने पडू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी 2019 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच विधानसभेचीही निवडणूक घेण्याच्या वरिष्ठ पातळीवरील हालचाली आणि चर्चा याचा विचार करून अनेक नगरसेवक अशी फ्लेक्सबाजी करत आहेत. वाढदिवसाचे आणि पालिका हद्दीतील गावांमधील जत्रांचे (उरुस) औचित्य साधून ही फ्लेक्सबाजी केली जात आहे. 

पालिका निवडणुकीत आपणास तिकीट मिळण्यासाठी ज्या आमदाराने प्रयत्न केले, त्याच आमदाराला शह देण्याचे मनसुबे नगरसेवकांकडून रचले जात आहेत. स्वपक्षाच्या विद्यमान आमदाराला डावलून आपणासच विधानसभेचे तिकीट मिळावे, यासाठी अनेकजण पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पक्षाचे तिकीट मिळाल्यास पालिकेप्रमाणे विधानसभेतही आपण मोदी लाटेवर पोहोचू शकतो, असा अंदाज अनेकजण बांधत आहेत. भावी आमदार म्हणून फ्लेक्सबाजी करणार्‍या नगरसेवकांमध्ये उपनगरांतील नगरसेवकांचे प्रमाण मोठे आहे; महिला नगरसेविकाही यामध्ये मागे नाहीत.

याशिवाय ज्या नगरसेवकाचा किंवा नगरसेविकेचा  फ्लेक्सवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख नसतो, त्याच्या घरातील एका व्यक्तीचा फोटोसह ‘भावी आमदार’ असा उल्लेख असतोच, असे फ्लेक्स प्रभागासोबतच पालिका भवनसमोर लावण्याची स्पर्धा अलीकडच्या काळात वाढली आहे. एकंदरीतच वर्षभरातच नगरसेवकांना आमदारपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.