होमपेज › Pune › लॉकडाऊनमुळे पुण्यात सर्वत्र शुकशुकाट; पोलिसांकडून नाकाबंदी 

लॉकडाऊनमुळे पुण्यात सर्वत्र शुकशुकाट; पोलिसांकडून नाकाबंदी 

Last Updated: Jul 14 2020 12:08PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने आजपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार शहरातील विविध रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळे रस्त्यावर तुरळक स्वरूपात वाहने आहेत. मात्र विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. 

अधिक वाचा : १७ जुलै पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी १४ जुलै ते १८ जुलै पर्यंत संपुर्णत: कडक लॉकडाऊनचे आदेश काढले आहेत. मेडिकल, दवाखाने आणि दुधाची विक्री सोडून इतर सर्व दुकाने आणि अस्थापना बंद ठेवण्यासोबतच ऑनलाईन खाद्यपदार्थ विक्री, शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृह, मटन, मासे, चिकन विक्री बंद राहणार आहे.

त्यानुसार पहाटेपासूनच शहरातील विविध रस्त्यावर बॅरिकेट्स लावून पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांकडून रस्त्यावरील प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहून पुढे सोडले जात आहे. एका दुचाकीवर दोघे आढळल्यास आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

अधिक वाचा :  पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांवर

वाहन चालकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पोलिसांकडून समज देऊन वाहने परत पाठवली जात आहेत. दुसरीकडे सर्व आस्थापने बंद असल्याने सर्व बाजारपेठा आणि अंतर्गत रस्ते ओस पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांवर वाहने दिसत नसली तरी काही टवाळखोर तरूण एकत्र येऊन दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचे चित्र पहायला मिळाले.  

दरम्यान, ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती, मधूमेह उच्च रक्तदाब, दमा, यकृत , मुत्रपिंडाचा आजार, कर्करोगाने बाधित रुग्ण, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांनी अत्यावश्यक सेवा अथवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच विनापरवाना फिरत असल्यास वाहने जप्त करण्यासोबतच वाहन परवाना रद्द करण्याचा इशाराही केला आहे.