होमपेज › Pune › सरकार मराठी भाषेबाबत कर्मदरिद्री

सरकार मराठी भाषेबाबत कर्मदरिद्री

Published On: Jan 25 2018 1:19AM | Last Updated: Jan 24 2018 10:51PMपिंपरी ः प्रतिनिधी

महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांत स्थानिक भाषेला विशेष महत्व दिले आहे. मराठी भाषेबाबत राज्य शासनाचे धोरण करंटेपणाचे असून भाषा संवर्धनासाठी दिला जाणारा निधी वाढवला पाहिजे. तमिळनाडू राज्यात तमिळ भाषेचे विद्यापीठ आहे. ते महाराष्ट्रात का असू नये? मुळातच शासन मराठी भाषेबाबत कर्मदरिद्री आहे आणि आपणही भाषेबाबत करंटेपणा करत आहोत. त्यामुळे शहरासह महाराष्ट्रात इतर भाषांचे वर्चस्व असल्याचे मत बडोदा येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. 

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील अ‍ॅटो क्‍लस्टर येथे बडोदा येथे आयोजित 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुलाखतीला उत्तर देताना डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार व महाराष्ट्र साहित्य परीषदेचे विश्‍वस्त उल्हास पवार, गोरख भालेकर, मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे आदी उपस्थित होेते. यावेळी डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांचा पुणेरी पगडी व शाल देऊन सत्कार करण्यात आला. 

डॉ. देशमुख म्हणाले, वाचनालये बळकट केली तर वाचनसंस्कृती वाढेल. अध्यक्ष होण्यामागे भूमिका काय तर प्रशासकीय अनुभव महामंडळ यांच्या संयुक्‍त विद्यमाने साहित्यिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे. मध्यमवर्गीय हाच कुठल्याही देशाची प्रगती करत असतो. परंतु, सद्यस्थितीत मध्यमवर्गीय संस्कार विसरले असून पूर्वीसारखे जग बदलून टाकण्याची ताकद उरली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश वाळूंज यांनी केले. प्रास्ताविक शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले यांनी केले. आभार नंदकुमार कांबळे यांनी मानले. 
दै. पुढारीच्या माध्यमातून अनाथांना मदतीचा प्रयत्न

कोल्हापुरात चांगली संधी मिळाली. तिथे बालकल्याण संकुल हे सेवेसाठी प्रसिध्द होते. तिथे अनाथ मुलांची चांगली देखभाल व्हायची, मीही प्रशासकीय सेवेत असताना दै. पुढारीच्या मदतीने लोकांना अनाथ मुलांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. अवघ्या सात ते आठ महिन्यांत दोन कोटी रुपयांची मदत लोकांनी केली. त्यातून अनाथ मुलांसाठी दोन इमारती बांधल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
‘वेगळी पायवाट निर्माण करणार’

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच, इतर राज्यांप्रमाणे ‘मराठी लर्निंग अ‍ॅक्ट’ तयार केला पाहिजे. मराठी भाषा व संस्कृती अभिन्न असून भाषा संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या कारकिर्दीत 365 दिवसांत 362 रेकॉर्डब्रेक व्याख्याने दिली आहेत. ते रेकॉर्ड तुम्ही मोडणार का, याबाबत मी कुणाचे रेकॉर्ड बेक्र करण्यासाठी नाही, तर स्वतःची वेगळी पायवाट निर्माण करणार असल्याचे लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.