Tue, Sep 22, 2020 08:04होमपेज › Pune › कोल्हापूर अपघात; नातवंडांनी गजबजणारं घर सुन्न झालं (Video)

कोल्हापूर अपघात; नातवंडांनी गजबजणारं घर सुन्न झालं (Video)

Published On: Jan 27 2018 4:32PM | Last Updated: Jan 27 2018 4:56PMनेहा सराफ/केतन पळसकर : पुढारी ऑनलाईन, पुणे 

भविष्यासाठी आपण अनेक योजना आखतो पण, विधात्याच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज मात्र कोणालाही बांधणे शक्य होत नाही. माणसाचा क्षणाचा भरवसा नाही हे वाक्य अनेकदा पटत आणि अनुभवही देत. याच वाक्याची प्रचिती आज पुण्यातील बालेवाडी भागातील नागरिक घेत आहेत. या भागात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या भरत केदारी यांचे कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले ते परत न येण्यासाठीच...बालेवाडी येथे राहणाऱ्या केदारी कुटुंबातील मुलगा, मुलगी  सुना, नातवंड अशा एकूण १२ जणांवर काळाने शुक्रवारी रात्री झडप घातली. कोल्हापूर येथे झालेल्या भीषण शब्दालाही थरथरायला लावेल अशा अपघातात त्यांची बस पंचगंगा नदीत कोसळली आणि केदारी कुटुंब अक्षरशः उध्वस्त झाले. 

वाचा मुख्य बातमी : कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

भरत केदारी यांना दिलीप आणि सचिन या मुलांसह छाया आणि मनिषा, या दोन मुली. भरत आणि मोठा मुलगा दिलीप वगळता केदारी यांचे सारे कुटुंबीय सचिनच्या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी गणपतीपुळ्याला गेले होते. सोबत दिलीप यांची पत्नी भावना, मुलगी श्रावणी, अनु आणि मुलगा साहिलही होते. त्यांच्यासह ज्याचा नवस फेडायचा होता तो अवघ्या नऊ महिन्यांचा आराध्य, त्याची बहीण संस्कृती यांच्यासह सचिन-नीलम दाम्पत्याने मोठ्या भक्तिभावाने गणपतीचरणी लीन होण्याचं ठरवलं. सोबत भरत यांच्या कन्या छाया आणि मनीषा यांचीही मुलंबाळं घेतली आणि सारे निघाले प्रवासाला पण कायमच्या... ! 

ज्यांनी आयुष्य काय आहे हे अनुभवलं पण नाही अशा ९ महिन्यांपासून ते १६ वर्षांपर्यंतच्या सात जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. नातवंडांनी हे घर कायम गजबजत असायचं ते आता सुन्न झालं आहे आणि शेवटपर्यंत राहील. यातील साहिल इयत्ता नववीत तर त्याची बहीण श्रावणी सहावीच्या वर्गात होते. संस्कृती दुसरीला तर प्रतीक नांगरे १०वीची परीक्षा देणार होता. शनिवारी दुपारी केदारी कुटुंबाच्या घराबाहेर आठ जणांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. लहान मुलाच्या दफनासाठीही तयारी करण्यात आली होती. क्षणाक्षणाला घराच्या बाहेर गर्दी वाढत होती आणि त्याचबरोबर आप्तस्वकीयांचा टाहोदेखील...! आता घरात कोणी कोणाला सावरायचं असाच प्रश्न उभा राहिला असून, त्यांची ही केदारी कुटुंबावर काळाने केलेला घात प्रत्येकाच्याच हृदयाला चटका लावून जाणारा आहे.