Sat, Sep 19, 2020 09:22होमपेज › Pune › खडकवासला धरण केवळ २९% पाणीसाठा

खडकवासला धरण केवळ २९% पाणीसाठा

Last Updated: Jul 16 2020 1:55AM
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

पुण्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने केवळ 29.57 टक्के इतका अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणक्षेत्रात मान्सूनचा पाऊस 25 टक्केही बरसला नाही. त्यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी  15 जुलै रोजी धरणसाखळीत 13.55 टीएमसी म्हणजे 46.48 टक्के पाणीसाठा होता. खडकवासला धरण भरून वाहत होते.

यंदा हवामान खात्याचे जोरदार पावसाचे अंदाजही खोटे ठरत आहेत. अतिवृष्टीच्या पानशेत, वरसगाव, टेमघर खोर्‍यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यात पाऊन न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

खडकवासला साखळीत 35 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याशिवाय धरणातून शेतीला पाणी सोडले जाणार नसल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पाऊस पडणार्‍या रायगड जिल्ह्यालगत असलेल्या पानशेत - वरसगाव धरणाच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रासह मुठा,  टेमघर, सिंहगड खोर्‍यात पावसाचा लंपडाव सुरू आहे. गेल्यावर्षी उशिरा पाऊस सुरू होऊनही नंतर धो-धो पाऊस पडत होता. त्यामुळे गेल्यावर्षी 10 जुलै रोजी खडकवासला धरण शंभर टक्के  भरून वाहत होते. 

गेल्यावर्षी 1 जून ते 15 जुलै 2019 या कालावधीत टेमघर येथे विक्रमी 1810 मिलिमीटर पाऊस पडला होता, तसेच  पानशेत येथे 1068 मि.मी., वरसगाव येथे 1069 मि.मी. आणि खडकवासला येथे 464 मि.मी. इतका पाऊस पडला होता. यंदा याच कालावधीत टेमघर येथे 888 मि.मी., पानशेत येथे 611 मि.मी., वरसगाव येथे 579 मि.मी., तर खडकवासला येथे फक्त 272 मि.मी. पाऊस पडला.

2011 मध्ये अशीच गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जुलैअखेरीस जोरदार पाऊस सुरू झाला होता. आज सकाळपासून पावसाचे ढग जमा होत आहेत. मात्र, पाऊस खाली उतरत नाही, अशी स्थिती चारही धरणांच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात आहे. दिवसभरात टेमघर व खडकवासलात केवळ 1 मि.मी. पाऊस पडला. सध्या पानशेतमध्ये 35.93 टक्के, वरसगावमध्ये 26.29 टक्के, टेमघरमध्ये 14 टक्के, तर खडकवासला धरणात 44.50 टक्के पाणीसाठा आहे.

पाणीसाठ्यात यंदा केवळ अडीच टीएमसीची भर 

पावसाळा सुरू होण्याआधी खडकवासला साखळीत 6  टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक होता. त्यात केवळ दीड महिन्याच्या पावसाने  जेमतेम अडीच टीएमसी पाण्याची भर पडली आहे. खडकवासला सिंहगड भागात पावसाचे प्रमाण कमी असते. मात्र, जोरदार   पाऊस पडणार्‍या  रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे ओढे-नाले, डोंगर कड्यातील  पाण्याचे प्रवाह  आटू लागले आहेत. भात लागवडीसाठी खाचरांत पुरेसा पाणीसाठा नाही, अशी गंभीर परिस्थिती सिंहगड, पानशेत परिसरात आहे.

 "