Thu, Jul 09, 2020 23:40होमपेज › Pune › आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल की कुरण?

आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल की कुरण?

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 11:16PMपुणे : सुनील जगताप

आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. हॉकी मैदानावरील स्टँड मोडलेल्या अवस्थेत आहे तर  ड्रेनेज लाईनही खराब झाली आहे.  सततच्या पावसामुळे वाढलेल्या गवताकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले असून आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल आहे की कुरण याच संभ्रमात क्रीडापटू पडलेे आहेत. 

श्री शिवछत्रपती क्रीडानगरी किंवा बालेवाडी क्रीडा संकुल हे पुणे शहराच्या बालेवाडी या उपनगरातील एक मोठे क्रीडा संकुल आहे. 1994 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बांधल्या गेलेल्या बहुपयोगी संकुलामध्ये 2008 च्या कॉमनवेल्थ युवा स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. बालेवाडी संकुलात 20 हजार आसनक्षमतेचे प्रमुख अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम, जलतरण केंद्र, बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल व व्हॉलीबॉल कोर्ट, बॉक्सिंग व कुस्ती  हॉल  आदी खेळांच्या सुविधा आहेत. याशिवाय हॉकी आणि फुटबॉलसाठीही मैदान तयार करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर 2010 रोजी येथे भारत व व्हिएतनाम राष्ट्रीय संघांदरम्यान फुटबॉल सामना खेळवला गेला. एफ.सी. पुणे सिटी, पुणे एफ.सी., पुणेरी पलटण, पुणे मराठाज, पुणे पिस्टन्स असे पुण्यामधील अनेक व्यावसायिक क्लब हे संकुल वापरतात.

याच आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आत्तापर्यंत अनेक विक्रमही प्रस्थापित झाले आहेत. तसेच या संकुलातील मोकळ्या जागेवर काही खासगी कार्यक्रमांसाठीही जागा वापरासाठी दिली जाते. वारंवार या संकुलांमध्ये विविध क्रीडा स्पर्धाही भरविल्या जात असताना अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची सध्या दुरावस्था झाली आहे. प्रत्येक स्टेडियमच्या आजुबाजूला गवत वाढले आहे.  वर्षाला लाखो रुपये कमविणार्‍या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाची अशा प्रकारे दुरवस्था झाल्याने क्रीडा विभागाचे अधिकारी करतात काय हा प्रश्‍न क्रीडा पटुंनी केला आहे.याबाबत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे प्रमुख आणि उपसंचालक आनंद व्यंकेश्‍वर म्हणाले की, सततच्या पावसामुळेे गवत कापता येत नव्हते. पावसाने उघडीप दिल्याने आता मशीनद्वारे गवत कापण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच, डे्रनेज लाईन इतर दुरवस्थेचेही कामही आगामी काळात करुन घेतले जाईल.