Wed, Jan 20, 2021 09:13होमपेज › Pune › कोहलीच्या अडीच शतकी खेळीने भारताचा धावांचा डोंगर

कोहलीच्या अडीच शतकी खेळीने भारताचा धावांचा डोंगर

Last Updated: Oct 11 2019 5:12PM
पुणे : पुढारी ऑनलाईन 

भारताचा विक्रमादित्य विराट कोहलीच्या नाबाद २५४ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर रचला. भारताने आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेने ३ बाद ३६ धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाज उमेश यादवने दोन गडी टीपले, तर शमीने एकाला बाद केले.  

भारताने कालच्या ३ बाद २७३ धावावरून खेळायला सुरुवात केली. नाबाद असलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली.  कर्णधार विराट कोहलीने दमदार द्विशतक झळकावले. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. तो ५९ धावांवर बाद झाला. विराटने सातव्या द्विशतकाची नोंद केली. बढती मिळालेल्या जडेजाचे अवघ्या नऊ धावांनी शतक हुकले. तो ९१ धावांवर बाद झाला. जडेजा बाद झाल्यानंतर भारताने डाव घोषित केला. 

पहिल्या दिवशी मयंक अग्रवालने झुंजार शतकी खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली होती. आज कोहलीने द्विशतक झळकावले. कोहलीने २९५ चेंडूत द्विशतक झळकावले. अजिंक्य रहाणेसोबत विराटने दीडशतकी भागीदारी केली. रहाणे आउट झाल्यानंतर विराटने जडेजासोबत शतकी भागीदारी केली.

विराटने कारकिर्दीतील २६ वे शतक पूर्ण केले. विराटचे भारतीय मैदानावरचे हे १२ वे शतक आहे. विशेष म्हणजे विराटच्या बॅटमधून तब्बल ११ महिन्यानंतर शतक निघाले आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना सुरु आहे. विशाखापट्टण येथे पहिली कसोटी जिंकून भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटीत भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे.