Sun, Aug 09, 2020 11:20होमपेज › Pune › ढोल-ताशा पथकांत मुलींचे वाढते प्रमाण

ढोल-ताशा पथकांत मुलींचे वाढते प्रमाण

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:09PMपिंपळे गुरव : प्रज्ञा दिवेकर

गणपती उत्सव अगदी काही दिवसांवर आल्याने सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागात गणपती मंडळांची व ढोल-ताशा पथकांची लगबग सुरू आहे. तर  दुसरीकडे यंदा ढोल-ताशा पथकांत मुलींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.  गणपती मिरवणुकीसाठी ‘साउंड सिस्टिम’ पेक्षा दिवसेंदिवस  पारंपरिक  वाद्यकला- ढोल-ताशा पथकाला  मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात शहर आणि उपनगरांत पथकांची संख्या वाढत आहे.   ढोल-ताशा पथकात मुली छंद अन् आवडीमुळे सहभागी होत असल्याचे  वाद्य पथकातील मुलींनी सांगितले. महिनाभर अगोदर गणपती मंडळे ढोल-ताशा पथकासाठी नावनोंदणी करतात. 

जवळपास दोन तासाला तीस हजार ते अगदी लाख रुपयांपर्यंत वाजवण्याची सुपारी घेतली जाते. पुणे आणि पुण्याबाहेर जसे सोलापूर, सातारा, सांगली, नगर भागात वाजवण्यासाठी वाद्य पथकाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. नवरात्र, गणपती, शिवजयंती व सण समारंभासाठी ढोल-ताशा पथकांना मागणी असते. सामर्थ्य ढोल-ताशा पथकातील झंकार साळी, समीर शेख, प्रथमेश हे वादक म्हणाले की, पथकाच्या सुपारीतून मिळणार्‍या पैशातून अंध मुलांच्या शाळेत दहीहंडी, रक्तदान शिबिर, अन्नदान आदी उपक्रम राबविले जातात.

पथकाचे पैसे सामाजिक उपक्रमासाठी : खोपडे

सुवर्णयुग ढोल-ताशा पथकाला सुपारीतून मिळणारे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले जातात. दिवाळीत पुस्तक प्रदर्शन, गरजू मुलांना पुस्तके-वह्या वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल, अनाथाश्रमात सण साजरे करणे आदी सामाजिक उपक्रम पथकातील तरुणाई उत्साहाने साजरे करते, अशी माहिती सुवर्णयुग ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष सागर खोपडे यांनी दिली.