Thu, Jul 09, 2020 23:23होमपेज › Pune › मावळात भात खरेदी-विक्रीस सुरुवात

मावळात भात खरेदी-विक्रीस सुरुवात

Published On: Nov 15 2018 1:16AM | Last Updated: Nov 14 2018 10:06PMकामशेत : किशोर ढोरे

मावळ तालुका हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. पर्जन्यमान उत्तम होत असल्याने, मावळात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. जमीनही कसदार असल्यामुळे भाताचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यावर्षी मावळात 12 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली होती; परंतु सप्टेंबर महिन्यात पिकात ऐन दाणे भरण्याच्या काळात पावसाने ओढ दिल्याने भात पिकाच्या उत्पादनात 25 टक्क्यांनी घट आली आहे; तसेच भात पीक काढणीच्यावेळी अवकाळीने फटका दिला. अशाही परिस्थितीत शेतकर्‍यांनी भात पिकाची काढणी केली असून, भाताच्या खरेदी-विक्रीस सुरुवात झाली आहे. उत्पादनात घट आल्याने यावर्षी शेतकर्‍यांना भाताचे भाव वाढण्याची अपेक्षा होती; परंतु यावर्षी अजूनही भाताचे दर स्थिर आहेत. त्यामुळे भात उत्पादक शेतकर्‍यांत नाराजीचा सूर आहे. 

मागील वर्षी इंद्रायणी भातास 2100 ते 2200 रुपये प्रति क्विंटल असा दर होता, तर यावर्षी  2200 ते  2400 प्रति क्विंटल दर आहे;  तसेच कोळंब जातीच्या भातास 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल चा भाव होता; तर तो मागील वर्षी प्रमाणेच स्थिर आहे. आंबेमोहोर भाताचा दर  देखिल मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी 2500  ते 3000  रुपये प्रति क्विंटल असा स्थिर आहे. यावर्षी उत्पादनात घट झाली असून देखील भाव स्थिर असल्याने शेतकर्‍यांत नाराजीचा सूर आहे. शासनाची भात पिकास 1750 ते 1790 प्रति क्विंटल आधारभूत किंमत आहे; पण भात पिकाची प्रतवारी कशी करावी व त्याची गुणवत्ता कशी तपासली जावी, या विषयी शासनाने व्यापार्‍यांना कोणत्याही प्रकारचे नियम व अटी लावल्या नसल्याने व्यापारी म्हणेल तीच गुणवत्ता शेतकर्‍यांना मान्य करून आपले धान्य विकावे लागत आहे. यामुळे भात पिकाचा दर्जा व गुणवत्ता ठरविण्याची एक नियामक पध्दत शासनाने अवलंबवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मावळात दरवर्षी सरासरी 4 लाख 28 हजार 800 क्विंटल भाताचे उत्पादन होते. मावळात उत्पादीत होणार्‍या भातास पुणे जिल्ह्यातील लोकांकडून मोठी मागणी असते. इंद्रायणी तांदूळ लांबीला छोटा असल्याने इतरत्र त्यास मागणी कमी आहे. यावर्षी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यात पाऊस कमी प्रमानात झाल्याने भात पिकाच्या उत्पादनात घट झालेली आहे. यामुळे दर वाढणे अपेक्षित होते; परंतु शेतकर्‍यांची धान्य विकण्याची घाई,  यामुळे त्यांना याचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मावळातील भात पीक हे प्रमुख पीक आहे. या पिकाची विक्री केल्यानंतरच हंगामी पिके घेण्यासाठी शेतकरी भांडवलाची निर्मिती करत असतात. त्यामुळेच शेतकर्‍यांना धान्य विकण्याची घाई असते.

यावर्षी भाताचे भाव स्थिर आहेत , उत्पादन 75 टक्के आहे पण पिकाचा दर्जा उत्तम आहे यामुळेच भाताला मागणी असल्याचे तांदळाचे व्यापारी विलास पिताणी यांनी सांगितले.