Fri, Sep 18, 2020 12:03होमपेज › Pune › मुंबईसह राज्यात मुसळधार 

मुंबईसह राज्यात मुसळधार 

Last Updated: Aug 06 2020 1:35AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

पावसाला अनुकूल स्थिती असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिवृष्टी या प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. तर मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. 

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. ठाण्यातही जनजीवन ठप्प झाले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सुरू असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची  उपनगरीय लोकल सेवेला फटका बसला. हवामान खात्याने गुरूवारी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांत संततधार सुरूच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही दमदार पाऊस पडत आहे. 

मुंबईची वाहतूक खोळंबली

मुंबईत सोमवार रात्री पासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी देखील आपली हजेरी कायम ठेवली. त्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचुन अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सुरु असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवेला फटका बसला. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी दरम्यानची वाहतुक दुपारी 3 वाजल्यानंतर बंद झाली. पश्चिम रेल्वेची वाहतुक देखील सकाळच्या वेळेत पालघर ते वसई-विरार दरम्यान खोळंबली.रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बसेस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. 

मध्य महाराष्ट्र, कोकणात 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार

8 ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र व कोकणात मुस0ळधार तर घाटमाथ्यावर अतिवृष्टी  तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार (ऑरेंज अलर्ट) तर उर्वरित भागातील जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्याच्या काही भागात संततधार कायम

पुणे जिल्ह्याच्या काही भागात दुसर्‍या दिवशी बुधवारी सायंकाळपर्यंत संततधार सुरूच होती. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरासह बारामती, जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र, वेल्हे, खडकवासला धरण साखळी, खेड व दौंड तालुक्यांत दमदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या अन्य ग्रामीण भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

 "