Mon, Aug 10, 2020 04:57होमपेज › Pune › वापराअभावी  मैदानाची दुरवस्था

वापराअभावी  मैदानाची दुरवस्था

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:50AMपिंपरी : संजय शिंदे

पालिकेच्या क्रीडा प्रशासनाने आंतरराष्ट्रीयस्तराची बास्केटबॉल, टेनिस कोर्ट आणि हॉकी मैदान खेळाडूंसाठी सव्वा वर्षे होत आली तरी खुली  केली नाहीत; तसेच मैदानाची सुरक्षा रामभरोसे असल्याने संबंधित मैदानावर अनधिकृतरीत्या क्रिकेट खेळ खेळला जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये  खर्चून  वापरलेल्या सिन्थेटिक टर्फ अनेक ठिकाणी फाटलेल्या दिसतात. मैदानाच्या देखभालीसाठी कर्मचारी नसल्यामुळे मैदानावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी मैदानाला कचराकुंडीचे स्वरूप आले  आहे. 

प्राधिकरणाने पालिका क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत केलेल्या सेक्टर नंबर 4 मध्ये टेनिस कोर्ट मैदानाचा समावेश आहे. त्याचा  परिसर 6 हजार 803 चौरस मीटर आहे. त्यामध्ये क्लब हाऊस, दोन टेनिस कोर्ट, व्हॉली-बॉल मैदान, वाहनतळ, जॉगिंग ट्रॅकचा  समावेश आहे.  सेक्टर नंबर 9 मध्ये बास्केटबॉल मैदानाचा पूर्ण परिसर 7 हजार668 चौरस मीटर येवढा आहे. त्यात  क्लब हाउस, चार सरावकोर्ट आहेत. जॉगिंग पार्क 2.50 बाय 258 मीटर, चारचाकी वहानतळासाठी 25.53 बाय 13.76 मीटर आणि दुचाकीसाठी 36.33 बाय 1.8 मीटर सोडले आहे.  सेक्टर 10 मध्ये हॉकी मैदान आहे. त्याचा  परिसर 5 हजार 214.40 चौरस मीटर आहे. त्यामध्ये 80 बाय 40 मीटर हॉकी मैदान, क्लब हाउस 278.55 चौरस मीटरचा समावेश आहे. परंतु क्रीडा विभागाने या मैदानांकडे दुर्लक्ष केले आहे. 

माहिती घेऊन सांगतो...

नवनगर विकास प्राधिकरणाने पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या मैदानाबाबत पालिका प्रशासच उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे. पाणी, वीज आणि सुरक्षा या तीन महत्त्वाच्या गोष्टीसाठी क्रीडा प्रशासनाने क क्षेत्रियाच्या संबंधित विभागाशी पाठपुरावा केला आहे; मात्र संबंधित अधिकार्‍यांना क्रीडा क्षेत्राविषयाची आस्था नसल्याचे पाहावयास मिळत आहे. सुविधा का पुरविल्या नाहीत? याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे अर्ज केले आहेत का, तर मग माहिती घेऊन सांगतो, अशी उर्मट उत्तरे देण्यात आली.