Sat, Aug 08, 2020 03:32होमपेज › Pune › महापरीक्षा पोर्टलविरोधात रान पेटले

महापरीक्षा पोर्टलविरोधात रान पेटले

Last Updated: Dec 03 2019 1:42AM
पुणे : प्रतिनिधी 

महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोहीम तीव— झाली आहे. पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारांमुळे महापरीक्षा पोर्टल तत्काळ बंद करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सोमवारी पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षेत हिंजवडी येथील केंद्रावर सुविधांची वाणवा असल्याने त्रस्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बंद पाडत परीक्षेवर बहिष्कार घातला. 

2017 साली तत्कालीन राज्य सरकारने सरकारी पदभरती करण्याची जबाबदारी ‘महाआयटी’ विभागाकडे दिली होती. या विभागाने पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी ‘महापरीक्षा पोर्टल’ची निर्मिती केली. सध्या राज्यात विविध पदभरतीच्या परीक्षा या ‘पोर्टल’व्दारे घेण्यात येतात. दरम्यान, एखादा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असला तरी त्याचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत येणे, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात देणे, अनेक परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न विचारून चुकलेल्या प्रश्नांचे सरसकट गुण बहाल करणे असे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. 

महापरीक्षा पोर्टलद्वारे सोमवारी (दि. 2) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या क्लार्क पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा हिंजेवडी येथील अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे परीक्षा घेण्यात येत होती. दरम्यान, परीक्षा कालावधीत कॉम्प्युटर बंद पडणे, लाईट जाणे यांसारख्या प्रकारांमुळे परीक्षार्थी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले. या वेळी आक्रमक  परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र बंद पाडत परीक्षेवर बहिष्कार टाकला. एकूणच महापरीक्षा पोर्टल विरोधात विद्यार्थ्यांच्या मनात तीव— भावना असून, पोर्टल बंद करण्याची मागणी केली जात आहे.