Tue, Jun 15, 2021 12:16
बारामती : अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजींनी उघडले डोळे!

Last Updated: May 11 2021 6:44PM

बारामती : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाबाधित ७६ वर्षीय आजींची हालचाल थांबल्याने नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र, आजींनी अचानक डोळे उघडले आणि क्षणात दुःखी वातावरण आनंदात रुपांतरित झाले. ही घटना बारामती तालुक्यातील मुढाळे येथे घडली.

अधिक माहिती अशी की, मुढाळे येथील आजीला २० दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर विलगीकरणात उपचार सुरू होते. वयोमानामुळे प्रकृती साथ देत नव्हती. मनात असूनही नातेवाईकांना रुग्णाची सेवा करता येत नव्हती. जवळ जावे तर कोरोनाचा धोका होता, त्यामुळे काही अंतरावरूनच आजीची सेवा सुरू होती. मागील तीन-चार दिवसात आजींची प्रकृती अधिकच ढासळत गेली.

कुटुंबीयांनी आजीला पुढील उपचारासाठी बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला. एका वाहनातून नेत असतानाच मधेच आजी निपचित पडल्या. त्यामुळे आजींचे निधन झाल्याचे समजताच नातेवाईकांशी संपर्क झाला आणि तेथून लागलीच नातेवाईकांना फोन करून माहिती देत वाहन माघारी वळवत घरी आणले गेले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. नातेवाईकांनी हंबरडा फोडणे सुरू केले. हे ऐकून आजीबाईंनी डोळे उघडल्याने सर्वांवरच आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. पुन्हा काही पै-पाहुण्यांना फोन करून आजी अजून आहेत, असा उलट निरोप देण्यात आला.

...तर अघटित घडले असते

कोरोनाने अनेक मर्यादा आणल्या. जवळचे माणूस गेले तरी जवळ जाता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेतही त्याचा प्रत्यय आला. अंत्यसंकाराची घाई केली असती तर मोठे अघटित घडले असते, अशी चर्चा घटनेनंतर सुरू झाली.