Mon, Aug 10, 2020 05:28होमपेज › Pune › तुमचं सरकारी रेकॉर्ड असुरक्षित...?

तुमचं सरकारी रेकॉर्ड असुरक्षित...?

Published On: Jun 19 2018 1:27AM | Last Updated: Jun 19 2018 12:23AMपुणे : टीम पुढारी

सर्वसामान्य नागरिकांच्या महत्वाच्या सरकारी कागदपत्रांचे रेकॉर्ड अनेक कार्यालयांमध्ये असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे. आरटीओ कार्यालयात आग लागून महत्वाचे रेकॉर्ड जळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. डिजिटल जमान्यात अनेक सरकारी कार्यालयांचे कामकाज अद्याप संगणकीकृत झाले नसल्याने जुन्या-जीर्ण कागदपत्रांचे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.

पुण्याच्या स्मार्ट महापालिकेचे रेकॉर्ड तीस ते चाळीस वर्षापासून मागील काही महिन्यांपयर्र्ंतची महापालिकेच्या विविध विभागातील महत्त्वाची जुनी कागदपत्रे नाना वाड्यात ठेवण्यात आली आहेत. आगी सारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी अग्नी रोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र ही यंत्रे कशी हाताळावी, त्याचा वापर कसा करावा, यासंबंधीचे कोणतेही प्रशिक्षण येथील कर्मचार्‍यांना देण्यात आलेले नाही,

त्यामुळे ही कागदपत्रे असुरक्षीत आहेत. न्यायालयामध्ये तीन वर्षापूर्वी आगीची घटना घडली, त्यावेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाली होती. आगीच्या घटनेनंतर न्यायालयालयातील दहा वर्षांपूर्वीची अग्नीशमन यंत्रणा बदलण्यात आली. न्यायालयाच्या रेकॉर्डचे काम सध्या संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. तर जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड जुन्या झेडपी आणि मार्केटयार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर झेडपीच्या रेकॉर्डचे संगणकीकरण झालेले नाही, त्यामुळे संगणकीकरण झाले नाही तर आगीची घटना घडल्यानंतर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरणकडून रेकॉर्डचे संगणकीकरण करण्यात आले असून, बहुतांश प्रमाणात ऑनलाईन कारभार सुरू आहे. तर कॅन्टोनमेंट बोर्डच्या रेकॉडचे संगणकीकरण सुरू आहे. शासकीय कार्यालयात आगीच्या घटना घडल्यानंतर त्याची झळ सर्वसामान्यांना पोचते. स्मार्टपणाचा दांडोरा पिटणार्‍या शासनाची महत्त्वाची, जनतेशी रोज निगडीत असणार्‍या कार्यालयांचेच संगणकीकरण करण्यात दिरंगाई होत असल्याचे पुढारीच्या पाहणीत आढळून आले आहे. बुधवारी (दि.13) आरटीओ कार्यालयात झालेल्या अग्नी तांडवामुळे अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली, मात्र सर्व कागदपत्रांचे संगणकीकरण झाले असल्याने धोका नसल्याचा दावा प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केला आहे. परंतुु, अशी घटना इतर शासकीय कार्यालयांमध्ये घडली तर हाती काहीच लागणार नाही अशी परिस्थिती आहे.