Thu, Jul 09, 2020 23:53होमपेज › Pune › गोमयापासून गणेशमूर्ती बनविणारा कलाकार

गोमयापासून गणेशमूर्ती बनविणारा कलाकार

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:04PMलोणावळा : विशाल पाडाळे

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. गणेशोत्सवातील मोठा बदल म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा झालेला शिरकाव व त्यातून निर्माण होत असलेली भयावह प्रदूषणाची समस्या. सोबतच घातक रासायनिक रंगांचा वापर.  या सर्वामुळे जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील एक युवक पुढे आला आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तीलाही त्याने एक उत्तम पर्याय शोधला आहे. तो पर्याय म्हणजे देशी गायीच्या शेणापासून तयार केलेली गणेशमूर्ती आणि या मूर्ती बनवणार्‍या युवकाचे नाव आहे प्रसाद विजयकुमार सिंदगी.

प्रसाद हा स्वतः बी. ई. केमिकल इंजिनिअर आहे. गणेशोत्सव काळात होणारे प्रदूषण बघून बैचेन झालेल्या प्रसादने यावर काहीतरी ठोस असा पर्याय निर्माण करण्याचे ठरवले. शाडू माती किंवा कागदाचा लगदा हा पर्याय होताच; मात्र हे दोन्ही पर्याय पर्यावरणपूरक असले तरीही पर्यावरणाला त्याच्यापासून फायदा असा काहीच नाही. त्याला असा पर्याय शोधायचा होता की तो पर्यावरणपूरकही असेल आणि पर्यावरणाला त्याच्यापासून फायदा झाला पाहिजे. आणि त्यातूनच त्याने देशी गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती निर्माण करण्याचा संकल्प केला आणि याला नाव दिले शुद्धी गणेश शुद्धी गणेश ही संकल्पना इतर पर्यावरणपूरक गणपतीपेक्षा वेगळी कशी?

यात गणेशमूर्ती तयार करण्यासाठी 70 टक्के देशी गाईचे शेण, 25 टक्के सुपीक माती, 4 टक्के तुरटी आणि 1 टक्का पंचगव्य वापरण्यात येते. वरील सर्व घटक मिसळताना त्यात गोमुत्राचा वापर केलेला आहे. या मूर्ती तयार करण्यासाठी प्रसादने तळेगाव दाभाडे येथे एक कारखाना सुरू केला आहे. आणि त्यातही विशेष म्हणजे या कारखान्यातील सर्व कामगार या महिला आहेत. एकूण 30 महिला हा कारखाना चालवीत असून संपूर्ण देशात पूर्णतः महिलांनी चालविलेला गणेशमूर्ती बनविण्याचा हा एकमेव कारखाना आहे. यात गणेशमूर्तीसाठी लागणारा लगदा बनविण्यापासून त्यांना रंग देऊन विक्रीसाठी तयार करण्याचे सर्व काम हे प्रसाद सिंदगी याच्या मार्गदर्शनाखाली महिलाच करतात.   या कारखान्यात 13 इंच ते 18 इंच उंचीपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात येतात. यांचे वजन साधारणतः एक ते अडीच किलोपर्यंत भरते. या वर्षी या कारखान्याने एकूण 2400 गणेशमूर्ती विक्रीचे उद्दिष्ट समोर ठेवले असून आतापर्यंत प्रसाद याच्या शुद्ध गणेश मूर्तींना पुणे, नागपूरसोबतच बाहेर देशातून म्हणजे दुबई, अमेरिका, इंग्लंड या ठिकाणांवरून मागणी आलेली आहे. 

थोडक्यात काय तर आपली संस्कृती पर्यावरणपूरक आहे. पर्यायाने आपले उत्सवही पर्यावरणपूरक असावेत, हा मूळ उद्देश समोर ठेवून प्रसाद यांनी आपले काम सुरू केले आहे. पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे हे देशाच्या प्रत्येक जाणत्या नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे चला तर यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करू या.