राष्ट्रवादीला धक्का; पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्याचे कोरोनाने निधन 

Last Updated: Jul 04 2020 12:22PM
Responsive image
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने


पिंपरी  : पुढारी वृत्तसेवा 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने (वय ४७) यांचे आज (शनिवारी) सकाळी कोरोनामुळे निधन झाले.  

वाचा :  कोरोनापासून बचावासाठी चक्क सोन्याचा मास्क 

साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दत्ता साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. आक्रमक नेता अशी त्यांची ओळख होती. कोरोनाच्या संकट काळात त्यांनी हजारो नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांच्या किटचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संपर्क आला होता.

वाचा : महापालिकेच्या मोठ्या कामांना ‘ब्रेक’

त्यांना न्यूमोनियाचाही त्रास होत होता. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात सर्वानाच धक्का बसला असून नागरिक, कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाचा : वायसीएम प्रयोगशाळेतून कोरोना चाचणीस सुरुवात

त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीने दु:ख व्यक्त केले आहे. ''पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युमुळे साने परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.'' असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दत्ताकाका साने यांच्या निधनाची बातमी नुकतीच समजली. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे. त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मंत्री जयंत पाटील ट्विटरद्वारे म्हटले आहे.