Sat, Dec 05, 2020 01:34होमपेज › Pune › गौतम पाषाणकरांची सुसाईड नोट मिळाली

गौतम पाषाणकरांची सुसाईड नोट मिळाली

Last Updated: Oct 25 2020 12:47AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील बेपत्ता प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून, पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत आहेत. पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर शहरातील उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पाषाणकर यांच्या कुटुंबीयांनी  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे  दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले.

गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचे आढळून आले. मागील काही दिवसांपासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी त्यात लिहिले आहे.

पोलिसांचे एक पथक सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेत आहेत. दुसरे एक पथक त्यांनी कोठे हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे का? याची तपासणी करत आहेत. तपासात त्यांनी मागील वर्षी ‘ओये’ वेबसाईटवरून दोनदा रूम बुक केल्याचे आढळले. मात्र, यानंतर त्यांनी परत ऑनलाइन पद्धतीने रूम बुक केलेली नाही, तर घरच्यांनी सुसाईड नोट्स सापडल्यावर त्यांचा खराडी येथील मालकीची गॅस एजन्सी, कंन्स्ट्रक्शन साईट, लवासा येथील फार्म हाऊस, नातेवाईक आदी ठिकाणी शोध घेतला.

सुसाईड नोट... 

माझ्या चुकांमुळे बिझनेसमध्ये मला  नुकसान झाले आहे. मी  खूप सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये शेवटी अपयश आले. त्यामध्ये मी माझी सर्व स्थावर मालमत्ता घालवून बसलो. ज्या व्यक्‍तींचे देणे राहिले त्यांचा मी दोषी आहे. यामध्ये माझ्या फॅमिलीचा कुठलाही संबंध नाही असे पाषाणकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.