Mon, Aug 10, 2020 05:22होमपेज › Pune › आरोग्यसेवा बळकट व्हावी

राज्यातील सात डॉक्टर खासदारांकडून अपेक्षा वाढल्या

Published On: May 26 2019 1:46AM | Last Updated: May 26 2019 1:33AM
पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

परवा देशाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामध्ये विजयी उमेदवारांच्या शिक्षणाचे अवलोकन केले असता  तब्बल सात डॉक्टरी पेशाचे उमेदवार खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत. या उमेदवारांपैकी दोन डॉक्टर एमबीबीएस; तर उरलेले पाच डॉक्टर हे एमबीबीएस पदवीसह विविध विषयांत पदव्युत्तर आहेत. देशातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्यांची त्यांना चांगलीच जाण असल्याने त्या सोडविण्याच्या दृष्टीने ही बाब आरोग्य क्षेत्रासाठी नक्‍कीच सकारात्मक आहे; त्यामुळे देशातील जनता, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि डॉक्टरांच्या सकारात्मक आरोग्यविषयक धोरणाविषयी अपेक्षा वाढलेल्या आहेत.

सध्या राज्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा ही राज्यकर्त्यांनी मुद्दामहून दुबळी ठेवल्याने खासगी वैद्यकीय सेवेलाच ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. एकूण बजेटच्या 5 टक्के तरतूद करण्याऐवजी दीड टक्के तरतूद केली जात आहे; त्यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेत उपचार मिळत  नाही आणि खासगी वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी गरिबातील गरीब व्यक्‍तीला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. सार्वजनिक आरोग्यसेवा दुबळी असल्याने एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकसंख्या ही खासगीमध्ये वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जाते; मात्र महागड्या उपचारांमुळे सध्या वर्षाला लाखो कुटुंबे दारिद्य्राच्या खाईत ढकलली जात आहेत. राज्यातील जनतेचे दुखणे आतापर्यंत कोणत्याच राज्यकर्त्यांना ओळखता आलेले नाही. मात्र, या टर्ममध्ये या सर्वांची जाणीव असलेल्या वैद्यकीय पेशातील उमेदवारांना जनतेने संधी दिल्यामुळे त्यांनी संधीचे सोने करावे, हीच त्यांची अपेक्षा आहे.

याबाबत बोलताना वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते संदीप खरात म्हणाले की, या डॉक्टर खासदारांना समाजाची सेवा करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातून संधी मिळाली आहे; पण त्यांची आरोग्यविषयक धोरणे हे खासगी वैद्यकीय सेवांची तळी उचलणारे असू नयेत. त्याऐवजी तळागाळातील सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्याकडे लक्ष द्यावे. यासाठी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे बजेट हे एकूण बजेटपैकी 5 टक्के मिळेल याकडे लक्ष द्यावे. तसेच खासगी वैद्यकीय सेवांच्या दरांवर नियंत्रण आणणे, सर्व राज्यांत वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करणे याकडे लक्ष द्यायला हवे; अन्यथा यापूर्वीच्या वैद्यकीय खासदार प्रतिनिधींनी  सार्वजनिक आरोग्यसेवेऐवजी खासगी वैद्यकीय सेवा कशी बहरेल याकडेच लक्ष दिलेले आहे, असे खरात यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे सांगतात, की वैद्यकीय पार्श्‍वभूमी असलेले खासदार निवडून जाणे ही आरोग्य क्षेत्र, वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय पुरवठादार आणि आरोग्य प्रशासनाच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे. आपल्या भारतीय आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणण्याचे कार्य या प्रतिनिधींनी करावे. डोणजे येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. गोपाळ गावडे यांच्या मते, एक तर वैद्यकीय प्रॅक्टिस न करणारे डॉक्टर राजकारणात प्रवेश करतात किंवा त्यांनी राजकारणात प्रवेश करून जिंकल्यानंतर ते प्रॅक्टिस न करता पूर्णवेळ राजकारणी बनतात. या दोन्ही प्रकारांतील प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ विसरतात; परंतु काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणे हे उत्तम आहे. 

हे आहेत नवनिर्वाचित वैद्यकीय खासदार  

डॉ. सुभाष भामरे - एमबीबीएस, कॅन्सरतज्ज्ञ, धुळे मतदारसंघ
डॉ. हिना गावित - एमबीबीएस एमडी, नंदूरबार मतदारसंघ
डॉ. प्रीतम मुंडे - एमबीबीएस, एमडी, बीड मतदारसंघ
डॉ. श्रीकांत शिंदे - एमबीबीएस, एमएस, कल्याण मतदारसंघ
डॉ. सुजय विख े- एमबीबीएस, मेंदू शल्यचिकित्सक, नगर मतदारसंघ
डॉ. अमोल कोल्हे - एमबीबीएस, शिरूर मतदारसंघ
डॉ. भारती पवार - एमबीबीएस, दिंडोरी मतदारसंघ